नाशिक (प्रतिनिधी): शहरातील दिंडोरी रोडवरील किशोर सुर्यवंशी मार्गावरील ओमकार नगर कॉलनी रोडवर रस्ता ओलांडत असताना बुलेट दुचाकीच्या धडकेत एका सहा वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून संशयित बुलेट चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे…
याबाबत अधिक माहिती अशी की, अर्णव रोशन भाबड (वय ६) राहणार (सुप्रभा बंगलो क्रमांक ७७) असे बुलेटच्या धडकेत मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे. अर्णव हा बालक काल शनिवार (दि.१०) रोजी सकाळच्या सुमारास आपल्या बंगल्यासमोरील रस्ता ओलांडत असतांना बिरसा मुंडा हॉस्पिटलकडून पेठरोडच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या बुलेट क्रमांक (एमएच १५ डीडब्ल्यू ८८००) या दुचाकीने त्यास जोरदार धडक दिली.
या धडकेत अर्णवच्या डोक्याला जबर दुखापत झाल्याने त्यास चुलते राकेश भाबड यांनी तात्काळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरानी त्यास तपासून मयत घोषित केले. तसेच या प्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक माळी करत आहेत. अर्णवच्या अपघाती मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान, यावेळी बुलेट दुचाकीचालकाविरोधात कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी मृत अर्णवच्या नातेवाईकांनी केली. तसेच जोपर्यंत संबंधित बुलेट दुचाकीचालकाविरोधात कारवाई होत नाही तोपर्यंत चिमुकल्याचा मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा संतप्त नातेवाईकांनी घेतला होता. त्यानंतर पोलिसांनी बुलेट चालकास ताब्यात घेतले.