नाशिक (प्रतिनिधी): सिडको सिंहस्थनगर येथुन नेपाळकडे देवदर्शनाकरिता निघालेल्या टेम्पो ट्रॅव्हल बसला उत्तर प्रदेशात लखनऊ जवळ झालेल्या अपघातात सिडकोतील सिंहस्थनगर येथील महिलेचा मृत्यू झालाअसुन दोन जण जखमी झाले आहेत. या अपघातात सुनिता अर्जुन आवारे ( वय ५५ ) यांचा मृत्यू झाला आहे.
सिडकोतील सिंहस्थनगर येथील ३९ प्रवासी दोन टेम्पो ट्रॅव्हल बसने १ जून रोजी नेपाळ काठमांडु कडे देवदर्शनाकरिता निघाले होते. या वेळी विविध शहरांना भेटी देत नेपाळ काठमांडू येथे दिनांक १० जुन रोजी पोहोचणार होते.
नेपाळ कडे जात असताना दुर्दैवाने लखनऊ चंदा गावाजवळ एशिपुर येथे बुधवारी पहाटे अडीच ते तीन वाजेच्या सुमारास टेम्पो ट्रॅव्हल बस च्या चालकास रस्त्यालगत उभी असलेल्या ट्रकचा अंदाज न आल्याने मागुन ठोस दिली.
या अपघातात बस च्या डाव्या बाजूच्या सिट वर बसलेल्या सुनिता अर्जुन आवारे ( वय ५५ ) यांना गंभीर मार लागल्याने त्या या अपघातात ठार झाल्या. तर अपघातात दोन जण जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती स्थानिक रहिवासियांना कळल्यानंतर त्यांनी मदतीसाठी प्रयत्न सुरु केले.
यावेळी सिडकोतील लोकनेता प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते गोविंद घुगे व सहकार्यांनी त्यांच्या परिचित व सद्य स्थितीत कानपुर येथे स्थायिक असलेल्या गोल्डी मसाला कंपनीचे मालक सुरेंद्र कुमार गुप्ता यांच्याशी संपर्क साधला.
त्यांनी क्षणाचाही विलंब न करता सर्वोतोपरी मदत करत जखमींना उपचारार्थ दवाखान्यात दाखल करण्यात आले. तर उर्वरीत तीस जणांना रेल्वेचे बुकिंग करून दिले आहे ते बुधवारी दुपारी रेल्वेने नाशिक कडे रवाना झाले आहेत.
इतर आठ जण दुसऱ्या टेम्पो ट्रॅव्हल बस ने नाशिक कडे रवाना झाले आहेत तर मयत सुनिता आवारे यांच्यावर आज गुरुवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. मयत सुनिता यांच्या पश्यात पती , मुलगा, मुलगी, सुन असा परिवार आहे .