नाशिक: दहावी निकालाच्या आदल्या दिवशीच इमारतीच्या गच्चीवरून ढकलून मुलीचा खून
नाशिक (प्रतिनिधी): इंदिरानगर परिसरात बुधवारी (ता. ३१) ला रात्री पाच मजली इमारतीच्या टेरेसवरून धक्का देत खाली पाडलेल्या आणि गंभीर जखमी झालेल्या एका सोळा वर्षे अल्पवयीन मुलीचे गुरुवारी (ता. १) उपचारादरम्यान निधन झाले.
इंदिरानगर येथील एका विद्यालयात ती दहावीला होती. शुक्रवारी (ता. २) लागणाऱ्या निकालाच्या आदल्या दिवशीच अशी घटना झाल्याने संपूर्ण कुटुंब मानसिक धक्क्यात आहे. पोलिसांनी अज्ञात दोघांविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदिरानगरच्या कैलासनगर भागात पिडीतेचे आई-वडील राहतात. ते मूळचे सारोळा (ता. पाथरी जि. परभणी) येथील आहे. बुधवारी सायंकाळी पिडीतेचे वडील आईसोबत भाजीपाला घेण्यासाठी लेखानगर येथे गेले होते.
तर भाऊ ओझर येथे गेला होता. आठच्या सुमारास ते परत आल्यानंतर घराच्या अंगणात अगदी त्यांच्या पुढ्यात त्यांची मुलगी धाडकन पडली. तातडीने त्यांनी शेजारच्यांच्या मदतीने तिला लेखानगर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
रुग्णालयात दाखल केल्यानंतर काही काळ ती बोलण्याच्या स्थितीत होती. त्यावेळी आई वडिलांनी नेमके काय झाले असे तिला विचारले असता दोघांनी तिला इमारतीच्या गच्चीवर नेले. पैकी एक ओळखीचा होता.
त्यानेच धक्का देऊन मला खाली ढकलून दिल्याचे तिने सांगितल्याचे पालकांनी पोलिसांना सांगितले. रात्रभर तिने मृत्यूशी झुंज दिली. आज दुपारी दोनच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ निरीक्षक गणेश न्यायदे आणि सहकाऱ्यांनी धाव घेत तपासाला सुरवात केली.
रात्री उशिरापर्यंत वरिष्ठ पोलिस अधिकारी इंदिरानगर पोलिस ठाण्यात ठाण मांडून बसले होते. दरम्यान अल्पवयीन मुलीच्या अंगावरील जखमा बघता आणि तिने तिच्या पालकांना दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.