नाशिक: मनपा शिक्षणाधिकारी सुनीता धनगर ५० हजाराची लाच घेताना ACB च्या जाळ्यात
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक मध्ये सध्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचखोर अधिकाऱ्यांना ताब्यात घेण्याची मोहीम अधिक व्यापक केल्याची दिसून येत आहे.
नाशिक मधील विविध शासकीय विभागांमधील लाचखोर अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहात पकडल्याचे वृत्त ताजे असतानाच नाशिक मनपा शिक्षणाधिकारी सुनीता धनगर व लिपिक नितीन जोशी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पन्नास हजार रुपयाची लाच घेताना ताब्यात घेतले आहे.
एका पाठोपाठ एक अधिकाऱ्यांना लाचखोरीच्या प्रकरणांमध्ये अटक करण्यात येत असून सध्या नाशिक मधील लाचखोर अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाकडून ही मोठी आणि गोपनीय कारवाई करण्यात आली आहे. अधिक चौकशीसाठी धनगर यांना ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या त्यांची कसून चौकशी सुरू आहे.
लाचलुचपत विभागाच्या कारवाईमुळे महापालिकेच्या वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. एका निलंबित मुख्याध्यापकाला कामावर पुन्हा रुजू करायचे होते. त्यासाठी लागणारे पत्र देण्यासाठी धनगर आणि जोशी यांनी ५० हजारांच्या लाचेची मागणी केली होती. यातील लिपिक जोशी यांनी ५ हजार रुपये स्वीकारले तर ४५ हजार रुपये शिक्षणाधिकारी धनगर यांना स्वीकारत असताना एसीबीच्या पथकाने पकडले आहे.