नाशिक: महिलांचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल करून बदनामी करणारा तरुण जेरबंद !
नाशिक (प्रतिनिधी): महिलांचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याचा आरोप असलेल्या संशयितांच्या नाशिकच्या सायबर पोलिसांनी गुजरातमध्ये जाऊन मुसक्या आवळल्या.
सायबर पोलिस स्टेशनमध्ये मार्च २०२० मध्ये एका महिलेने तक्रार दाखल केली होती. पिडितेची सोशल मीडियाच्या माध्यमातून एका अनोळखी इसमाची ओळख झाली. पीडित महिलेशी प्रेम असल्याचे भासवून विश्वास संपादन करून तिचे अश्लील फोटो देण्यास भाग पाडले.
त्यानंतर फोटो पिडीतेच्या पती व नातेवाइकांना व्हॉटसअॅप द्वारे पाठवून, पुन्हा अश्लील फोटो नातेवाईकांना प्रसारित न करण्याच्या बदल्यात पैशांची मागणी करून ब्लॅकमेल केले.
पैसे स्वीकारून वारंवार पैशांची मागणी करून शिवीगाळ व धमकी दिल्याची तक्रार दिल्यावरून सायबर पोलिसांत ६ मार्च २०२० ला गुन्हा नोंदविण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयिताचे नाव व पत्ता तांत्रिक विश्लेषणावरुन निष्पन्न करण्यात आले होते. संशयित मृत्युंजय ऊर्फ अंशुमन राजेश पटेल, (वय २४, गवापूर, बेलथर रोड, जि. बलिया, उत्तर प्रदेश) हा २०२० पासून स्वतः चे अस्तित्व लपवून विविध मोबाईल क्रमांक व सोशल मीडियाच्या बनावट प्रोफाईलवरून फिर्यादी यांच्याशी संपर्क करून त्रास देत होता.
संशयिताच्या शोधाकरीता तपास पथक राहत्या पत्त्यावर गेले असता, त्यास तपास पथकाची माहिती प्राप्त झाल्याने तो तपास पथकास चकमा देत पळून गेला होता. त्याने स्वतःचे सर्व सोशल मीडिया खाते व मोबाईल क्रमांक बंद केले होते.
सायबर पथकाने तांत्रिक व व्यावसायिक कौशल्याचा वापर करून संशयित सतत वाराणसी, सुरत, व मोरबी या गुजरातमध्ये लपून व राहते ठिकाण बदलत असल्याची माहिती प्राप्त केली होती.
सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांनी सुरेश कोरबू, किरण जाधव, संतोष काळे, विकास पाटील यांच्या मदतीने संशयितास रंगपारबेला, (जि. मोरबी, गुजरात) येथून अटक केली. न्यायालयाने तपासाकामी ४ दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे. सदर तपासादरम्यान त्याने यापूर्वी ४ ते ५ महिलांना अशाच प्रकारे शारीरिक व मानसिक त्रास दिल्याचे उघडकीस आले आहे.
![]()
