नाशिक: उड्डाणपुलावर बंद आयशरला कंटेनरची पाठीमागून धडक; माय-लेकीचा जागीच मृत्यू
नाशिक (प्रतिनिधी): नाशिकमधल्या द्वारका-आडगाव उड्डाणपुलावर बंद आयशरला कंटेनरने पाठीमागून धडक दिली. या भीषण अपघातात माय-लेकीचा जागीच मृत्यू झाला. आज सकाळी ही घटना घडली. याबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.
नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. वाहनचालकांची बेबंदशाही, अक्षम्य दुर्लक्षपणा त्यासाठी कारणीभूत ठरत आहे.
नाशिक-मुंबई महामार्गावर द्वारका-आडगाव उड्डाणपूल आहे. मंगळवारी सकाळी या ठिकाणी एक बंद पडलेला आयशर उभा होता. त्याला कंटेरनची पाठीमागून धडक बसली. या अपघातामध्ये कंटेरनर चालकाच्या शेजारी बसलेल्या माय-लेकीचा जागीच मृत्यू झाला. इगतपुरीहून धुळ्याकडे हा कंटेनर चालला होता. घटनेनंतर पंचवटी पोलिस ठाण्याचे पोलिस घटनास्थळी पोहचले. त्यांनी पुढील तपास सुरू केला आहे.
नाशिक जिल्ह्यात रस्ते अपघातांची संख्या वाढत असून जानेवारी 2022 ते जून 2022 या सहा महिन्यांच्या कालावधीत नाशिक शहर व जिल्ह्यात 602 जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. मागील काही वर्षांपासून रस्ते अपघातांचे प्रमाण वाढले असून राज्यातील सहा महिन्यांची आकडेवारी पाहता 17 हजार 275 अपघात झाले असून, यात 8 हजार 68 जणांचा विविध अपघातांत मृत्यू झाला आहे.
14 हजार 200 जण कायमचे जायबंदी झाले आहेत. नाशिक जिल्ह्यात 518 व शहरात 102 अपघाती मृत्यू झाले आहेत. राज्यातील आकडेवारी बघता नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. रस्ते अपघात रोखण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाकडून प्रभावी नियोजन होत नसल्याने अपघातांची संख्या वाढत आहे.