नाशिक (प्रतिनिधी): नाशिक मुंबई महामार्गावर तळेगाव शिवारात शनिवारी (ता.२२) सायंकाळी पाचच्या सुमारास डस्टर कारने अचानक पेट घेतली. या घटनेत कार संपूर्ण जळून खाक झाली, मात्र चालकासह दोन प्रवासी बचावले आहे.
महामार्गाच्या सर्विस रोडला डस्टर कारने (एमएच ४८, पी ५४३९) सकाळी पाहुण्यांना मुंबई विमानतळावर सोडवून परतीच्या प्रवासात कसारा घाट येथे थांबले. जेवणानंतर घाट चढून येत असताना गाडीच्या क्लचमध्ये बिघाड होऊन ब्रेक फेल झाला व गाडीतून धूर निघू लागला.
चालक मालक विलास विठ्ठल पितळे ( रा. सामनगाव, जि. नाशिक) यांनी प्रसंगावधान राखत गाडी सर्व्हिस रस्त्यावर घेऊन हॅन्ड ब्रेकच्या सहाय्याने गाडीवर नियंत्रण मिळवत गाडी नीलकमल हॉटेलजवळ उभी केली.
तोपर्यंत गाडीतून धूर निघायला सुरुवात झाली होती, त्यामुळे चालकासह दोन प्रवाशांनी वाहनातून खाली उतरून प्रसंगावधान राखत बाहेर पडले. पाणी आणून गाडीच्या बोनेटर मारले, मात्र तोपर्यंत उशीर झाला व गाडीने पेट घेण्यास सुरुवात केली, काही वेळात संपूर्ण गाडीने डोळ्यादेखत पेट घेतला आणि गाडी आगीच्या भक्षस्थानी पडली.
या घटनेची माहिती भ्रमणध्वणीद्वारे महामार्ग पोलिसांना दिली असता महामार्ग पोलिस केंद्र घोटी यांनी तत्काळ घटनास्थळी पोहचून महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीची अग्निशमन दलाची गाडी पाचारण करीत वाहनाला लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. मात्र आग आटोक्यात येत नव्हती, तोपर्यंत इगतपुरी नगरपरिषद व महामार्ग सुरक्षा पथकांच्या अग्निशमन दलाच्या गाडया घटनास्थळी पोहचल्याने एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले.
महामार्ग पोलिस तपास करीत आहेत. महामार्ग सुरक्षा पोलिस पथक, पोलिस उपनिरीक्षक सोपान राखोंडे, महिंद्रा कंपनीचे वरिष्ठ अधिकारी, फायर ऑफिसर, फायरमन अजय म्हसने, गणपत अवघडे, मनोज भडांगे, विशाल सकट, एम. बी. खेताडे, एम. एन. भटाटे, नगरपरिषदचे फायर मॅन व चालक नागेश जाधव, फिरोज पवार, सुभाष बागडे, जमीर पटेल, अजय तुपे, गोलू भारूळे, राज जावरे आदींनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले.