नाशिक (प्रतिनिधी): कर्जापोटी दिलेल्या दहा लाख रुपयांच्या वसुलीसाठी कर्जदाराच्या घरात घुसून जिवे ठार मारण्याची धमकी देणार्या खासगी सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की धवल जगदीश गज्जर (वय 33, रा. गोविंदनगर, नाशिक) यांनी आरोपी खासगी सावकार दिलीप खैरनार (काठे गल्ली, द्वारका, नाशिक) याच्याकडून दहा लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. हे दहा लाख रुपये मागण्यासाठी खैरनार यांनी दि. 89 ते 11 एप्रिलदरम्यान संदर्भ सेवा रुग्णालयाजवळ गज्जर यांच्या घरात अनधिकृतपणे प्रवेश केला.
दरम्यान, कर्जाचे पैसे मागण्यासाठी दिलीप खैरनार यांनी फिर्यादी धवल गज्जर व त्याच्या नातेवाईकांना शिवीगाळ केली, तसेच पैसे परत केले नाहीत, तर जिवे मारून टाकण्याची धमकी दिली.
या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात खासगी सावकार दिलीप खैरनार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे करीत आहेत.