नाशिक कॉलिंगचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
नाशिक: 66 लाखांची लुट करणाऱ्या दोघांच्या आवळल्या मुसक्या; साडेचार महिन्यांची गुन्ह्याची उकल
नाशिक (प्रतिनिधी): गेल्या नोव्हेंबर महिन्यात होलाराम कॉलनीतील राहत्या घरी कारने जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व बांधकाम व्यावसायिक कन्हय्यालाल मनवाणी यांना वाटेतच कारचालक व त्याच्या भावाने बंदुकीचा धाक दाखवून ६६ लाख ५० हजारांच्या रोकडसह अपहरण केले.
महामार्गालगत मनवाणी यांना सोडून देत पसार झालेल्या दोघा संशयितांना अखेर शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकच्या पथकाने सापळा रचून शिताफीने अटक केली आहे. त्यांच्याकडून ५२ लाखांची रोकड, कार व मोबाईल हस्तगत केला असून, याप्रकरणी दोघा संशयितांना न्यायालयाने येत्या बुधवारपर्यंत (ता. ५) तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
युवराज मोहन शिंदे (३७), देवीदास मोहन शिंदे (२६, दोघे रा. सातपूर) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा संशयितांची नावे आहेत. १५ नोव्हेंबर २०२२ रोजी रात्री कन्हय्यालाल तेजसदास मनवाणी हे त्यांच्या कुलकर्णी गार्डन परिसरातील त्यांच्या बांधकाम व्यावसायिक कार्यालयातून घरी कारने निघाले.
होलाराम कॉलनी येथे त्यांची कार आली असता, कारचालक देवीदास शिंदे याने कार थांबविली. त्यावेळी कारमध्ये एक संशयित मनवानी यांच्या शेजारी बसला आणि त्याने बंदुकीचा धाक दाखवून मनवानी यांच्याकडील ६६ लाख ५० हजार रुपयांची रोकड ताब्यात घेतली.
उकळत्या तेलाच्या कढईत पडून होरपळली, नाशिकमध्ये सहा वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी अंत
त्यानंतर दोघांनी मनवानी यांना पाथर्डी फाटा परिसरात उतरवून चोरट्यांनी मनवानी यांची कार (एमएच १५ जीएफ ९५६७) चोरून नेली होती. त्यानंतर चोरट्यांनी पळविलेली मनवानी यांची कार अंबड शिवारात सापडली होती. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात दोघांविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे.
दरम्यान, दोघे संशयित फरार असल्याने सरकारवाडा पोलिसांसह शहर गुन्हेशाखेचे युनिट एकचे पथक संशयितांचा शोध घेत होते. गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ, अंमलदार प्रवीण वाघमारे, प्रदीप म्हसदे, संदीप भांड, नाझिमखान पठाण, प्रशांत मरकड, विशाल देवरे, योगीराज गायकवाड, मुक्तार शेख यांचे पथक संशयितांच्या मागावर होते.
त्यावेळी दोघे संशयित नाशिकला आल्यानंतर पथकाने त्यांना सातपूर परिसरातून ताब्यात घेतले. दोघांकडून लुटीतील रोकड व लुटीच्या पैशातून विकत घेतलेली चार लाख रुपयांची कार, ३० हजार रुपयांचा मोबाइल, बॅग असा मुद्देमाल जप्त केला आहे. संशयितांचा ताबा सरकारवाडा पोलिसांकडे सोपविण्यात आला आहे. न्यायालयाने दोघा संशयितांना बुधवारपर्यंत (ता.५) पोलिस कोठडी सुनावली आहे.
मुंबई, पुणे, गोव्यात मौजमजा:
संशयित शिंदे बंधूंनी लुटी रक्कम घेऊन कोल्हापूर गाठले आणि तिथेच वास्तव्याला होते. चार लाखांची कार खरेदी केल्यानंतर ते मुंबई, पुणे आणि गोव्याला फिरून आले. यादरम्यान त्यांनी या पैशांच्या जिवावर मौजमजा केली.
डान्सबार आणि कुंटणखान्यावर जात त्यांनी पैशांची उधळपट्टी केली. फिरत असताना ते लुटीची रक्कम सोबतच बाळगत असल्याचे पोलिस तपासातून समोर आलेले आहे. नवीन कार खरेदी करून पुन्हा लुटीचा डाव दोघांनी आखला होता. त्यासाठी ते सावज हेरत होते. मात्र, त्यापूर्वीच ते पोलिसांच्या तावडीत सापडले.
ऑर्केस्ट्रा गायक ते चोर:
संशयित शिंदे बंधुंतील युवराज शिंदे हा गायक होता. त्याने एक ऑर्केस्ट्राही सुरू केला होता. तसेच, त्याला विविध टीव्हीवर सुरू असणाऱ्या गायकांच्या कार्यक्रमातही सहभागी व्हायचे होते. त्याचप्रमाणे, त्याला झटपट श्रीमंत व्हायचे होते. त्यासाठी त्याने लहान भाऊ देवीदास यांच्यासमवेत मनवाणी यांच्या लुटीचा कट रचला.
लुटीचा प्रयत्न सफल झाल्यानंतर किमान दोन-तीन वर्षे नाशिकला परतायचे नाही याच उद्देशाने ते निघून गेले होते. गेल्या साडेचार महिन्यात त्यांनी आपल्या कुटुंबीयांशी संपर्कही साधला नाही. मात्र पोलिसांनी रचलेल्या सापळ्यात दोघेही सापडल्याने ते आता गजाआड आहेत.