नाशिकसह जिल्ह्यात चौथ्या दिवशी अवकाळीसह गारपीट, शेतीपिकांत गारांचा खच
नाशिक (प्रतिनिधी): नाशिकसह जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली असून जिल्ह्यातील काही भागात गारपीट झाल्याने मोठ्या प्रमाणावर शेतीपिकांचे नुकसान झाले आहे.
त्याचबरोबर अनेक भागात पशुधनाचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे अवकाळी पावसाने सलग चौथ्या दिवशी हजेरी लावत शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे.
आज पुन्हा सकाळपासूनच ढगाळ हवामान नाशिकसह जिल्ह्यात पाहायला मिळाले. सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास वादळ वारा आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली.
नाशिक कॉलिंगचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळी त्र्यंबकेश्वर हरसूल, सुरगाणा, पेठ, चांदवड, मनमाड या भागांत मोठ्या प्रमाणावर अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळी वाऱ्यांसह झालेल्या या पावसाने गहू, हरभरा, कांदा इट रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. शिवाय जिल्ह्यातील इतर भागातील शेकडो गावांना अवकाळी पावसाचा फटका बसला.
दरम्यान त्र्यंबकेश्वर, चांदवड व कळवण तालुक्यात गारांचा पाऊस झाला असून, जिल्ह्यातील बागलाण, देवळा, सुरगाणा, पेठ या तालुक्यांत पावसाने जोरदार बॅटिंग केली. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून अवकाळी पाऊस बरसत आहे. या पावसामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून काढणीला आलेल्या कांदा पिकाची हानी होत शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. शनिवारी जिल्ह्यातील कसमा पट्ट्यात पावसाने जोरदार हजेरी लावली तर सुरगाणा, अभोणा येथील आठवडे बाजारावर परिणाम झाला. त्यामुळे विक्रेत्यांची एकच धांदल उडाली. दिंडोरी परिसरालाही पावसाने झोडपले.
निफाड तालुक्यात पुन्हा गारपीट झाली आहे. निफाड तालुक्यातील कुंभारी व पंचकेश्वर शिवारात आज सायंकाळी साडेचारच्या सुमारास तब्बल वीस मिनिटे गारपीट झाल्याने द्राक्षबागांसह कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. द्राक्षबागांची काढणी सुरू होण्यापूर्वीच हे अस्मानी संकट कोसळल्याने शेतकरी शेतकरी हवालदिल झाला आहे.