नाशिकमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
नाशिक (प्रतिनिधी): नाशिकमध्ये भाजपचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे आणि भाजप नगरसेविका इंदुमती नागरे यांचे पुत्र तथा भाजपचे पदाधिकारी विक्रम नागरेवर घोटी पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर शहरात खळबळ उडाली आहे.
इगतपुरी तालुक्यातील भरविर खुर्द येथील राहणाऱ्या अनिरुद्ध शिंदे या जामिनावर सुटलेल्या संशयिताने काल दुपारी भरवीर खुर्द गावी राहत्या घरी आत्महत्या केली होती.
यानंतर मयत शिंदे यांच्या पत्नीने घोटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत मुकेश शहाणे आणि विक्रम नागरे यांनी अनिरुद्धला खंडणीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवले.
तसेच वारंवार त्रास देत असल्याने पतीने जीवन संपवल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मृतांच्या नातेवाइकांनी घोटी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले होते.
त्यानंतर या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
मयत अनिरुद्ध शिंदे यांच्या पत्नी वैशाली अनिरुद्ध शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अनिरुद्ध हे सातपूर एमआयडीसी येथील खाजगी कंपनीत नोकरी होते. मात्र इगतपुरी तालुक्यातील भरवीर खुर्द येथे शेती असल्याने या ठिकाणी नेहमी येणे जाणे असायचे. सासू नंदाबाई धोंडू शिंदे या भरवीर खुर्द गावात राहत होत्या. मात्र मागील एक महिन्यापासून अनिरुद्ध शिंदे यांच्याकडे सातपूर येथे राहण्यासाठी आल्या होत्या. मात्र अनिरुद्ध शिंदे यांच्याविरुद्ध विक्रम सुदाम नागरे यांनी सातपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात शिंदे सध्या जामिनावर सुटले असल्याने ते भरवीर खुर्द येथे राहत होते.
दरम्यान अनिरुद्ध शिंदे जामिनावर असल्याने त्यांना शोधण्यासाठी सातपूर पोलिसांसह विक्रम नागरे व मुकेश शहाणे हे येत असल्याने अनिरुद्ध हा भरवीर येथे निघून गेला होता. या ठिकाणाहून अनिरुद्धने त्याच्या पत्नीस फोन करून सांगितले की विक्रम नागरे आणि मुकेश शहाणे यांनी खोट्या गुन्ह्यात फसवले असून याचा मला खूप त्रास होत आहे. यामुळे मी माझं जीवन संपत असल्याचे त्यांनी फोनवरून सांगितले. दरम्यान 27 डिसेंबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास वैशाली शिंदे यांच्या भावाने फोनकरून सांगितले की अनिरुद्ध याने भरविर येथे काहीतरी विषारी औषध सेवन केले आहे. त्यानंतर ही सगळी मंडळी भरवीर येथे गेली. या ठिकाणी स्थानिक पोलीस देखील पोहोचलेले होते.