मित्राच्या लग्नाला गेलेल्या नाशिकच्या दोघा मित्रांचा हॉटेलमधील गॅस गळतीत होरपळून मृत्यू
नाशिक (प्रतिनिधी): सातपूरमधील दोघे उत्तर प्रदेशात मित्राच्या लग्नासाठी गेले होते. तेथे हॉटेलमध्ये झालेल्या गॅस गळतीमुळे भाजले होते.
यातील एकाचा घटनेच्या दिवशीच तर दुसऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रकाश सुधाकर दाते (३०) व बादशाह परवेज शेख (२६) अशी त्यांची नावे आहेत.
सातपूर येथील हॉटेल भोलेनाथच्या संचालकांच्या मुलाचे लग्न उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथे होते. या लग्नासाठी सातपूरमधील सात युवक स्कॉर्पिओ या वाहनाने गेले होते.
८ तारखेला लग्नसोहळा आटोपल्यानंतर ते दर्शनासाठी लखनऊ येथे गेले होते. तेथे त्यांनी हॉटेलचा रूम बुक करून तेथे मुक्काम केला. रात्री हॉटेलच्या खालीच असलेल्या बिर्याणी कॉर्नर येथे प्रकाश व बादशाह हे दोघे मित्र बिर्याणी खाण्यासाठी गेले होते.
उर्वरित पाच मित्र हॉटेलमधील रूममध्येच होते. याचवेळी बिर्याणी कॉर्नरच्या हॉटेलमध्ये गॅस गळती होऊन भीषण आग लागली. यात प्रकाश दाते हा १०० टक्के भाजल्याने त्याचा त्या दिवशीच मृत्यू झाला होता. तर बादशाह शेख हा ७० टक्के भाजल्याने त्याच्यावर लखनऊ येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.
- नाशिक: अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत पालखी यात्रेतील दोघा साई भक्तांचा मृत्यू
- नाशिक: सैन्य दलात नोकरीस लावून देण्याचे आमिष; तोतया लष्करी जवानाकडून ११ लाखांची फसवणूक
या घटनेनंतर जखमी बादशाहच्या कुटुंबियांनी तत्काळ लखनऊकडे धाव घेऊन मुलाला वाचविण्यासाठी प्रयत्न केले. मात्र रविवारी (दि. १८) उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सोमवारी (दि. १९) त्याच्यावर सातपूर येथील रजविया मशिदीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेतील मयत प्रकाश दाते हा सातपूर परिसरातील बँकेत सुरक्षा रक्षकाची नोकरी करत होता. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले, बहीण असा परिवार आहे. तर बादशाह शेख हा अविवाहित असून त्याचे वडील परवेझ हे सातपूर परिसरात पान- सुपारीचा होलसेलचा व्यवसाय करतात.