Live Updates: Operation Sindoor

नाशिक: २४ वर्षीय गर्भवती महिलेची तब्बल ४५ दिवस आयुष्याची लढाई…! काळ आला होता पण..

नाशिक (प्रतिनिधी): आधुनिक उपचारपद्धतीचा योग्य वापर आणि डॉक्टरांचे टीम वर्क यामुळे कधी कधी अशक्यप्राय गोष्टी देखील शक्य होऊ शकतात. याचाच प्रत्यय नाशिकच्या अपोलो रुग्णालयात काही दिवसांपूर्वी आला.

२४ वर्षांची एक गर्भवती महिला श्वासोच्छवासाचा त्रास होत असल्याने जळगाव येथे उपचार घेत होती पण तिची प्रकृती अधिक बिघडल्याने पुढील उपचारासाठी तिला नाशिकच्या अपोलो हॉस्पिटल येथे दाखल आले. प्राथमिक तपासणीत तिला गंभीर स्वरूपाच्या न्युमोनियाची लागण झाल्याचे लक्षात आले. छाती आणि फुफुस विकार तज्ञ डॉ. प्रवीण ताजणे यांनी तातडीने अतिदक्षता विभागात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले. अतिदक्षता तज्ञ डॉ महेन्द्र बागुल, डॉ. अतुल सांगळे आणि डॉ सागर पटेल यांच्या टीमने याप्रसंगी मोलाची भूमिका बजावली.

त्याचवेळी रुग्ण सहा महिन्यांची गरोदर असल्याने आणि त्यात पोटात जुळी बाळं असल्याने श्वास घ्यायला अधिक त्रास होत होता आणि ऑक्सीजनची गरज देखील वाढती होती आणि त्याच वेळी पेशंटच्या पायांच्या रक्तवाहिन्यात रक्ताच्या गाठी तयार झाल्याचे लक्षात आले. रुग्णाची तब्येत आणखीनच खालावली आणि रुग्णाला वेंटिलेटरवर घेऊन कृत्रिम श्वासोच्छवास देण्याचा निर्णय घेण्यात आला आणि  उपचार सुरू ठेवले.

👉 हे ही वाचा:  भारताने जैसलमेरमध्ये पाकिस्तानी फायटर जेट पाडले; एक पाकिस्तानी पायलट भारतीय सैन्याच्या ताब्यात !

पेशंट दीर्घकाळ वेंटिलेटर वर असूनही ऑक्सिजन पातळीत अपेक्षित सुधारणा होत नव्हती. ऑक्सिजनचे प्रमाण कमीच राहत असल्याने पेशंटला पालथ्या अवस्थेत झोपवून उपचार सुरु ठेवले. प्रकृती गंभीर असल्याने रुग्णाचा गर्भपात देखील झाला परंतु स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र तज्ञ डॉ उमा मोदगी यांनी ही परिस्थिती कौशल्यपूर्णरीत्या हाताळली आणि रुग्णाची नॉर्मल डिलेव्हरी करण्यात आली.

दरम्यान फुफ्फुसांतील जंतुसंसर्ग वाढला आणि त्याचा परिणाम किडनीवर देखील होऊ लागला त्यावेळी किडनीविकार तज्ञ डॉ मोहन पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली उपचारात आवश्यक ते बदल करण्यात आले. रुग्णाचा रक्तदाब सातत्याने खालच्या पातळीवर राहत असल्याने त्यासाठीची औषधे देखील द्यावी लागली आणि सुमारे ३५ दिवसांनी रुग्णाच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होऊ लागली. वेंटिलेटर ची गरज कमी होत आहे असे लक्षात आले .

👉 हे ही वाचा:  नाशिक: केटीएचएम कॉलेज येथे आज (दि. ७ मे) झालेल्या मॉक ड्रिलची क्षणचित्रे…

आता सगळं काही ठीक होत आहे असे वाटत असतानाच पेशंटची शुद्ध पुन्हा कमी होऊ लागली आणि शरीराची एक बाजू देखील कमकुवत होत असल्याचे लक्षात आले. मेंदूचा MRI करण्यात आला आणि मेंदूच्या दोन्ही बाजूना सूज (ADEM) असल्याचे लक्षात आले. यावेळी मेंदूविकारतज्ञ डॉ. जितेंद्र शुक्ल यांच्याशी चर्चा करून उपचार सुरु करण्यात आले. यातच पेशंटच्या आतड्यांची हालचाल देखील मंदावली आणि पोट फुगू लागले. पोटविकारतज्ञ डॉ शरद देशमुख आणि डॉ मिलींद शहा यांच्या मार्गदर्शनाखाली यावर उपचार करण्यात आले. ह्दयरोगतज्ञ डॉ निर्मल कोलते यांनी उपचारादरम्यान वेळोवेळी मार्गदर्शन केले.

अतिदक्षता विभागातील परिचारिकांनी रुग्णाची योग्य ती काळजी घेतली. आहारतज्ञ आणि फिजीयोथेरपी विभागाने देखील पेशंटच्या उपचारात महत्वपूर्ण भूमिका बजावली.

👉 हे ही वाचा:  नाशिक: अल्पवयीन मुलांना हाताशी धरून चेनस्नॅचिंग; चार लाखांचे सोने केले जप्त

अखेर जवळपास ४५ दिवसांच्या प्रदीर्घ लढाईनंतर रुग्णाची वेंटिलेटर आणि ऑक्सिजनपासून सुटका झाली. इतके दिवस नळीवाटे अन्न घेणारी महिला स्वतः जेवण घेऊ लागली. हातापायांची हालचाल नीट सुरू झाली. आधी आधार घेत आणि नंतर सहजपणे चालू लागली आणि रुग्णाला घरी पाठवण्यात आले .

‘काळ आला होता पण वेळ आली नव्हती’ ही उक्ती अक्षरशः सार्थ ठरली. इतक्या कठीण परिस्थितीत देखील रुग्णाची इच्छाशक्ती आणि सहनशीलता वाखडण्या जोगी होती. यामध्ये रुग्णाच्या नातेवाईकांनी देखील संयम ठेवला आणि अपोलोच्या टीमवर पूर्ण विश्वास ठेवत खूप सहकार्य केले .

अपोलो हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागातील तज्ञ डॉक्टर्स डॉ. लीना भंगाळे, डॉ बालाजी वड्डी, डॉ. राहूल भामरे  डॉ. मृणाल चौधरी , डॉ अमोल खोळमकर, डॉ सचिन भाबड यांच्या अथक परिश्रमांना यश आले आणि रुग्णाचे प्राण वाचले. अपोलो हॉस्पिटलच्या टीमचे यावेळी सर्वत्र कौतुक होत आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790