नाशिक: टाटा कंपनीचे सबकॉन्ट्रॅक्ट देण्याचे आमिष दाखवून ६३ लाख रुपयांची फसवणूक
नाशिक (प्रतिनिधी): टाटा कंपनीचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले असून, तुम्हाला सबकॉन्ट्रॅक्टर म्हणून काम देतो, असे सांगून पुण्याच्या दोन भामट्यांनी 47 लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी राजू बबन काकड (वय 42, रा. धोंगडे मळा, नाशिकरोड) यांनी उपनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यात म्हटले आहे, की संशयित आरोपी प्रतीत अशीत शाह व क्रितिका अशीत शाह (दोघेही रा. द समर्थ कॅपिटल, बाणेर, पुणे) हे दोघे टेरा फर्मा सुपर स्ट्रक्ट एलएलपी कंपनीचे भागीदार आहेत.
शाह यांनी फिर्यादी राजू काकड यांना टाटा कंपनीचे 55 कोटी 58 लाख 47 हजार 451 रुपयांचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहे, असे खोटे सांगून बनावट कागदपत्रे दाखविली.
दरम्यान, प्रतीत शाह व क्रितिका शाह या दोघांनी फिर्यादी काकड यांच्याशी वारंवार संपर्क साधून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर दि. 22 ऑक्टोबर 2021 रोजी पुणे येथील रुबी हॉस्पिटल शेजारील मिलियम स्टार बिल्डिंग येथे काकड यांना बोलावले. सबकॉन्ट्रॅक्टर म्हणून काम देण्यासाठी फिर्यादीशी पुन्हा संपर्क साधण्यात आला. कंपनीचे कॉन्ट्रॅक्ट देण्यासाठी काकड यांच्याकडून प्रतीत व क्रितिका शाह यांनी 63 लाख 40 हजार 41 रुपये देण्यास भाग पाडले. काकड यांनी हे पैसे त्यांना दिले; मात्र पैसे देऊनही कंपनीचे कॉन्ट्रॅक्टही मिळत नाही व सबकॉन्ट्रॅक्टर म्हणून काहीही कागदपत्रे मिळाली नाहीत.
त्यामुळे काकड यांनी दोघा आरोपींकडे पैशाबाबत विचारणा केली असता त्यांनी प्रथम उडवाउडवीची उत्तरे देऊन पैसे देण्यास टाळाटाळ केली; मात्र काही दिवसांनी प्रतीत व क्रितिका शाह यांनी 63 लाख 40 हजार 41 रुपयांपैकी 16 लाख रुपये परत केले; मात्र बरेच दिवस उलटूनही उरलेले 47 लाख 40 हजार 41 रुपये आजपर्यंत आरोपींनी परत न करता काकड यांचा विश्वासघात करून फसवणूक केली. ही बाब लक्षात आल्यानंतर काकड यांनी प्रथम उपनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. हा गुन्हा पुणे येथे घडल्याने कोर्टाकडून प्राप्त झालेल्या कागदपत्रांनुसार हा गुन्हा बंडगार्डन पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.
![]()


