नाशिक: दांडिया खेळताना धक्का लागल्याच्या कारणावरून एकाचा खून
नाशिक (प्रतिनिधी): उपनगर परिसरातील शिवाजीनगर येथे मंगळवारी (ता.४) रात्री दांडिया खेळताना धक्का लागल्याच्या कारणावरून झालेल्या झटापटीत एका युवकाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला.
याप्रकरणी उपनगर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे.
बबलू लोट (१९, रा. महालक्ष्मी चाळ, द्वारका) असे मयत युवकाचे नाव आहे.
उपनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवरात्रोत्सवानिमित्ताने शिवाजीनगर परिसरात रास दांडियाचे आयोजन करण्यात आलेले असल्याने परिसरातील नागरिक त्याठिकाणी दांडिया खेळण्यासाठी आलेले होते.
- नाशिक: गरबा सुरु असतांना इलेक्ट्रिक शॉक लागून डीजे ऑपरेटरचा मृत्यू
- नाशिक: पत्नीसह सासरच्या मंडळीच्या छळास कंटाळून युवकाची आत्महत्या
- व्यवसाय कुठलाही असो, जाहिरात फक्त नाशिक कॉलिंगवरच.. इथे क्लिक करा…
याचठिकाणी मयत बबलू लोट उर्फ कमल हा त्याचा मित्र अनिकेत शिंदे (रा. शिवाजीनगर) याच्यासमवेत दांडिया खेळण्यासाठी आला होता. दांडिया खेळत असताना अनिकेत यास अल्पवयीन मुलाचा धक्का लागला.
त्यावरून त्यांच्यात वादावादी झाली. त्यानंतर दांडिया संपल्यानंतर जमलेले नागरिक घरांकडे परतत असताना मयत बबलू याने झालेल्या बाचाबाचीचा जाब संशयित अल्पवयीन मुलांना विचारला. त्यावरून बबलूने त्या अल्पवयीन मुलांना मारहाण केली. त्यामुळे त्या अल्पवयीन मुलांचेही साथीदार आले आणि पुन्हा झटापट झाली असता, एकाने बबलूच्या पोटात चाकूने भोसकले.
घाव वर्मी बसल्याने बबलू यास तात्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारादरम्यान बुधवारी (ता.५) पहाटे त्याचा मृत्यु झाला. घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलिसांनी दोन अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. आणखी दोघांचा पोलीस शोध घेत आहेत. याप्रकरणी अनिकेश शिंदे याच्या फिर्यादीनुसार, उपनगर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, उपायुक्त विजय खरात यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर हे तपास करीत आहेत.