0 ते 12 वयोगटातील कोवळ्या बालकांनी दिला कोरोनाशी लढा; ५६ बालके कोरोनामुक्त

नाशिक (प्रतिनिधी): गेल्या दोन महिन्यांपासून आलेल्या कोरोनाच्या संसर्गात अनेकजण होरपळले आहेत. जिल्ह्यातील रुग्णसंख्या १ हजार ४७४ पर्यंत पोहोचली. यापैकी ९७३ रुग्णांनी कोरोनाशी दोन हात करून हा लढा जिंकला आहे. मात्र लढ्यात जिल्ह्यातील ८७ बालकांचाही समावेश असल्याने त्यांच्या पालकांसह आरोग्य यंत्रणेचाही जीव टांगणीला लागला होता. मात्र आरोग्य यंत्रणेचे योग्य उपचार, पालक आणि बालकांची उपचारपद्धतीला मिळालेली साथ त्यामुळे आज जिल्ह्यातील ५६ बालके कोरोनामुक्त झाली आहेत.

तसेच उर्वरित ३१ बालकेही लवकरच कोरोनामुक्त होवून सुखरुप घरी परततील, असा विश्वास आरोग्य यंत्रणेने व्यक्त केला आहे. कोरोनाने पाच दिवसांच्या अर्भकापासून तर ९० वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकालाही आपल्या विळख्यात घेतले आहे. मात्र अशा नाजूक परिस्थितीतही आरोग्य यंत्रणेने अतिशय दक्षतेने कोरोनाविरोधातील लढा सुरू ठेवल्याने त्याचे फलित समोर येत आहेत. त्यामुळेच ही कोवळी बालके या कोरोनाच्या विळख्यातून सुखरुप बाहेर पडली आहेत.

हे ही वाचा:  नाशिक जिल्ह्यात दुपारी ३ वाजेपर्यंत झाले 'इतके' टक्के मतदान…

जिल्ह्यात १४७४ रुग्णांना कोरोनाची लागण झाली. त्यातील ९७३ रुग्ण आज बरे होवून घरी परतले आहेत. या रुग्णसंख्येमध्ये ८७ बालकांचा समावेश असल्यामुळे आरोग्य यंत्रणेपुढे मोठा पेच उभा राहिला होता. या मुलांना परिस्थिती समजावून सांगणे, त्यांना परिवारापासून दूर ठेवणे, वेळेवर उपचार करणे अशी तारेवरची कसरत आरोग्य यंत्रणेने केली. त्यामुळे आज ० ते १२ या वयोगटातील ५६ बालके कोरोनामुक्त झाली आहेत. उर्वरित ३१ बालकेही लवकरच बरे होवून आपल्या घरी जातील, असा विश्वास आरोग्य यंत्रणेला आहे.

हे ही वाचा:  नाशिक: खाजगी बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; एक जण जखमी

मालेगावात सर्वाधिक बालके कोरोनामुक्त

जिल्ह्यात ० ते १२ वयोगटातील पहिला करोनाबाधित बालक १० एप्रिल रोजी आढळून आले. त्यानंतर हा आकडा हळूहळू वाढत ८७ पर्यंत पोहोचला. कोरोनाचे रुग्ण जसे मालेगावात जास्त आहेत, तसेच कोरोनाबाधित बालकांचे प्रमाणही मालेगावात सर्वाधिक आहे. मालेगावात ४३ बालकांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यात २६ मुले व १७ मुली आहेत. त्यापाठोपाठ येवला आणि नाशिकमधील प्रत्येकी चार, तर सिन्नर, चांदवड, निफाड येथील प्रत्येक एका बालकाचा समावेश होता. सद्यस्थितीत ५६ बालके कोरोनामुक्त झाली आहेत. ३१ बालकांवर उपचार सुरू असून, ही सर्व बालके उपचाराला प्रतिसाद देत आहेत. त्यांनाही लवकरच घरी सोडण्यात येणार आहे.

हे ही वाचा:  नाशिक: वेब कास्टिंग कक्षाद्वारे जिल्ह्यातील मतदान केंद्रांवरील मतदान प्रक्रियेचे निरीक्षण

पालकांच्या समुपदेशनावर भर

बालकांना कोरोना संसर्ग होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. लक्षणेदेखील सौम्य असतात. त्यामुळे अशा बालकांसह त्यांच्या पालकांच्या समुदेशनावर भर दिला. त्यांना सर्वसाधारण औषधी देण्यात आली. नवजात बालकांची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी स्तनपान गरजेचे होते. त्यामुळे बालकांसह आईचीदेखील खूप काळजी घेतली असे बालरोगतज्ज्ञ डॉ.पंकज गाजरे यांनी सांगितले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790