
सातपूरला चार चाकी व दोन मोटारसायकल यांच्यात तिहेरी अपघात; एक युवक ठार
नाशिक (प्रतिनिधी): सातपूर विभागीय कार्यालयासमोर काल (दि. ८ ) सायंकाळी ६ वाजता चारचाकी व दोन मोटारसायकल यांच्यात झालेल्या तिहेरी अपघातात दशरथ निवृत्ती चौधरी (वय २३) हा युवक ठार, तर एक दाम्पत्य जबर जखमी झाले आहे.
याबाबत सातपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दशरथ चौधरी (वय २३, रा. पालघर, हल्ली रा. दाणी मळा, सातपूर) हा युवक महानगरपालिका विभागीय कार्यालय, सातपूर येथून जात असताना नाशिक बाजूने त्र्यंबकेश्वरकडे भरधाव जाणार्या एमएच १५ जीएक्स ८७७८ या क्रमांकाच्या होंडा वरना या गाडीने चौधरी यास जोरदार धडक दिली.
चौधरी जबर जखमी झाल्याने त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
तसेच या अपघातात वरना वाहनचालकाने दुचाकीवरून जात असलेल्या एका दाम्पत्यालाही उडविल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत.
- नाशिक: ओ मामीsss; मामी म्हटलं म्हणून राग आला, ग्राहकाची केली धुलाई!
- नाशिक: रात्री जेवणानंतर शतपावली करण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा वाहनाच्या धडकेत मृत्यू
मनपा सातपूर विभागीय कार्यालयासमोर याआधीही अपघातात नागरिकांनी जीव गमावले आहेत. या ठिकाणी असलेले हॉटेल, बँक व स्वारबाबानगर येथे जाण्यासाठी असलेला रस्ता यामुळे नागरिकांची नेहमी वर्दळ असते, तसेच त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी खासगी वाहनांनी अनेक भाविक या मार्गाने ये-जा करतात.
या ठिकाणी योग्य ते दिशादर्शक व योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकत्या माया काळे यांनी केली आहे. या अपघाताप्रकरणी कारचालकास ताब्यात घेतले असून पुढील तपास सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक महेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक उपनिरीक्षक आरिफ सय्यद करत आहेत.