गाव येऊनही न थांबल्याने चालत्या रिक्षातून घाबरून तिने उडी मारली अन् जागीच प्राण गमावले
नाशिक (प्रतिनिधी): शाळेतून गुणपत्रक घेऊन घरी परतताना गाव येऊनही चालकाने रिक्षा न थांबवल्याने चालत्या रिक्षातून दोन विद्यार्थिनींनी उडी घेतली.
यात दहाव्या इयत्तेत असलेल्या एकीच्या डोक्याला मार लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला तर दुसरी ११ वर्षीय विद्यार्थिनी जखमी झाली.
रविवारी सकाळी ११ च्या सुमारास ही गंभीर घटना घडली.
रिक्षाचालकास अटक करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गायत्रीच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वीच निधन झाल्याने ती मामांकडे आटकवडे येथे राहत होती. डुबेरे येथील जनता विद्यालयातील १० वीत प्रविष्ट झालेली गायत्री अशोक चकणे (१४, रा. वडगाव पिंगळा, ह. मु. आटकवडे) असे मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. सायली भगवान आव्हाड (११, रा. आटकवडे) ही जखमी झाली. दोघीही गुणपत्रिका घेऊन घरी परतत होत्या. डुबेरे येथून आटकवडेला कोंबड्या घेऊन जाणाऱ्या अॅपे रिक्षाला हात देवून त्या पाठीमागे बसल्या.
चालक समीर अहमद शेख (रा. डुबेरे) याला आटकवडे येथे रिक्षा थांबवण्याचे लक्षात आले नाही. गायत्री व सायली यांनी आवाज देवूनही त्यास ऐकू गेले नाही. रिक्षा थांबत नसल्याने दोघींनी चालत्या रिक्षातून उडी घेतली. गायत्रीच्या डोक्याला मार लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. सायलीच्या डोक्याला व हाताला मार लागल्याने ती जखमी झाली.
रस्त्याने जाणाऱ्या वाहनचालकांनी पुढे जाऊन रिक्षा चालकास थांबवून घडलेला प्रकार सांगितला. स्थानिकांनी रुग्णवाहिका बोलावून खासगी रुग्णालयात दाखल केले. गायत्रीचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विजय माळी, पोलिस नाईक चेतन मोरे यांनी घटनास्थळी धाव घेतली.