Live Updates: Operation Sindoor

कापडणीस पिता-पुत्र खूनप्रकरण:खुनाच्या तीन कथा; संशयित राहुल जगतापने उलगडले रहस्य

नाशिक (प्रतिनिधी): शहरातील कापडणीस पिता-पुत्र दुहेरी हत्याकांडातील संशयित राहूल जगताप याने पोलिसांना वेगवेगळ्या प्रकारच्या कथा सांगत दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.

परंतु, पोलिसांनी कसून तपास करत त्याच्याकडून सत्यकथन करत गुन्ह्यांची यशस्वीरित्या उकल केली आहे.

याबाबत पोलिस उपायुक्त अमोल तांबे यांनी सविस्तर माहिती दिली.

दरम्यान, गुन्ह्यांची उकल करणारे अधिकारी, कर्मचारी यांचा पोलिस आयुक्त दीपक पांडे यांच्या उपस्थिीतत गौरव करण्यात आला.

नाना-अमित अमेरिकेत आहेत, नानांचा खून अमितने केला, अमित मला ५० टक्के हिस्सा देणार होता, अशा तीन कथा रचून खून मी केलाच नसल्याचा बनाव संशयित राहुल जगताप याने केला. तपास कौशल्य आणि चौकशीतून अचूक धागे पकडून पोलिसांनी जगतापला बोलते केले.

डित कॉलनी परिसरातील गोपाळ पार्कमधील रहिवासी मुक्त विद्यापीठाचे माजी कुलसचिव नानासाहेब कापडणीस आणि त्यांचे पुत्र डॉ. अमित यांचा खून झाला. या खूनाचा तपास सरकारवाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक साजन सोनवणे आणि त्यांच्या पथकाने करत, या खूनाची उकल केली. याच पार्श्‍वभूमीवर उत्कृष्ट अधिकारी व अंमलदार यांचा सरकारवाडा पोलिस ठाण्यात गौरव करण्यात आला. यावेळी पोलिस उपायुक्त श्री. तांबे यांनी या प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम विशद केला. ते म्हणाले, की कापडणीस यांच्या मुलीने वडील व भाऊ बेपत्ता असल्याची तक्रार दिल्यानंतर यामध्ये नक्कीच मोठे काहीतरी आहे, याची शंका आली होती. त्यादृष्टीने तपासी अधिकाऱ्यांनी अधिकाधिक माहिती मिळविली असता, कापडणीस यांच्या बँक डिटेल्सवरुन आम्ही संशयित राहूल यास ताब्यात घेतले.

👉 हे ही वाचा:  यंदा मान्सूनचे लवकर आगमन – १३ मेपूर्वी अंदमानात प्रवेश, महाराष्ट्रातही लवकर हजेरीची शक्यता

संशयित राहूलने प्रत्येक चौकशीमध्ये वेगवेगळ्या कथा सांगितल्या. यात त्याने प्रथम कापडणीस हे कर्जबाजारी झाल्याने पिता-पुत्र नाशिक सोडून गेल्याचे सांगितले. मात्र, त्यांच्याकडे खूप पैसे असल्याने ते असे का करतील अशा संशय आल्याने राहूलचे खोटे अर्ध्या तासात पकडले. त्यानंतर दुसऱ्या चौकशीत त्याने अमितनेच पैशांसाठी वडिलांना मारुन तो गोवा येथे पळून गेल्याचे सांगितले. यात कापडणीस यांची स्वाक्षरी असलेले धनादेश वापरुन राहूलने अमितच्या खात्यात पैसे देखील टाकल्याचे दिसले. जेणेकरुन मुलानेच पैशांसाठी खून केल्याचे समजेल. मात्र संशयित राहूलची हालचाल, बोलणे यावरुन तो खोटे बोलत असल्याचे कळल्यानंतर व पहिल्या दोन्ही कथा हा त्याने रचल्या असल्याने अखेर पाच तासांच्या तिसऱ्या चौकशीत त्याने सर्व कबूल केल्याचे श्री. तांबे यांनी सांगितले.

👉 हे ही वाचा:  महावितरणच्या नाशिक मंडळ अधिक्षक अभियंतापदी राजेश थूल रुजू

राहूलने नाना कापडणीस यांचा खून कसा केला, मृतदेहांची कशी विल्हेवाट लावली, त्यानंतर डॉ. अमित यांचादेखील कसा खून केला, त्यांच्या मृतदेहाची कशी विल्हेवाट लावली, तसेच आपल्यावर संशय येवू नये म्हणून दोन्ही मृतदेह हे वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या हद्दीत टाकले. या सर्व बाबींचा उलगडा सरकारवाडा पोलिसांनी सखोल तपासातून केल्याचेही तांबे यांनी नमुद केले. पोलिस आयुक्त श्री. पांडे यांनीदेखील या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामगिरीचे कौतुक करत, त्यांचा सत्कार केला व पिता-पुत्राचा खून हा प्रकार विकृतीसारखाच असून, याला आळा बसणे फार गरजेचे असल्याचे सांगितले. पोलिस उपायुक्त विजय खरात, दिलिप बारकुंड, पोर्णिमा चौघुले, सहाय्यक पोलिस आयुक्त दीपाली खन्ना, तसेच पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक आदींसह कर्मचारी उपस्थित होते.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790