नाशिक (प्रतिनिधी): नाशिक महानगरपालिकेच्या वतीने यापूर्वी घोषित केलेले १०४ ठिकाणांसह विभागीय कार्यालयांतर्गत मनपा मालकीची मैदाने,मोकळी जागा सोसायटी व कॉलनीच्या मोकळ्या आवारात भाजीपाला व फळ विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे असल्याची माहिती उपायुक्त प्रदीप चौधरी यांनी दिली.
नाशिक शहर व परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याच्या दृष्टीने विविध उपाययोजना केल्या जात असताना भाजीपाला व फळ खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर होणारी नागरिकांची गर्दी टाळण्याच्या दृष्टीने मनपाने यापूर्वी १०४ ठिकाणी भाजीपाला व फळ विक्री करण्यासाठी परवानगी दिली होती.
ज्या ठिकाणी बंदिस्त असलेले आत व बाहेर जाण्याकरिता एकच मार्ग असलेले भाजी मार्केट बंद करण्याबाबत विभागीय अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या आहेत. या व्यतिरिक्त विभागीय कार्यालया अंतर्गत मनपाच्या मालकीची मैदाने, मोकळी जागा तसेच सोसायटी व कॉलनीच्या मोकळ्या आवारात एकाच ठिकाणी सामाजिक अंतराचे पालन, तोंडावर मास्क घालणे, विक्रेत्यांनी हातामध्ये हॅन्ड ग्लोजचा वापर करणे व इतर नियमांचे निकष पाळून भाजीपाला व फळ विक्री करण्यास परवानगी दिली असल्याची माहिती उपायुक्त प्रदीप चौधरी यांनी दिली.
तसेच भाजीपाला व फळ विक्रेते यांनी सेवा देताना अनावश्यक गर्दी होणार नाही दोन व्यक्तींमध्ये सामाजिक अंतराचे पालन राहील,तोंडावर मास्क घालून विक्रेत्यांनी हातामध्ये हातामध्ये हॅन्ड ग्लोज वापरणे आणि सँनिटायझरचा वापर करावा असे आवाहन नाशिक महानगरपालिकेच्या वतीने उपायुक्त प्रदीप चौधरी यांनी केले आहे.