तब्बल पाच हजार लोकं एमएसआरटीसीच्या बसने त्यांच्या मूळगावी रवाना

नाशिक(प्रतिनिधी): कोरोना विषाणू रोगामुळे राज्यात संचारबंदी लागू असल्याने, महाराष्ट्र राज्यात इतर राज्यातील अडकलेल्या परप्रातीयांना आपल्या मुळगावी पायपीट करत जावे लागू नये म्हणून, राज्य शासनाने  स्थानिक प्रशासनाच्या मदतीने  मुंबई आग्रा महामार्गावरून पायी चालत आपल्या मुळ गावी परतणाऱ्या इतर राज्यातील लोकांना त्यांच्या राज्याच्या सिमेपर्यंत मोफत बसने सोडण्याची व्यवस्था केल्याने ही लोकं भावूक झाली होती.

दि.(९मे२०२०)मध्यरात्री पासून ते दि(१६मे२०२०) पर्यंत या ७ दिवसांच्या कालावधीत आजपावेतो महानगर पालिका क्षेत्रातून नाशिक महानगरपालिका प्रशासन व पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त नियोजनातून नाशिक आगार क्रमाक १ व २ मधून २०० बस द्वारे ४४०० लोकांना त्यांच्या मुळगावी जाण्यास मदत झाली आहे. त्यापैकी २ बसेस झारखंड राज्याच्या सिमेपर्यंत व १६९ बसेस मध्यप्रदेशच्या सिमेपर्यंत पाठविण्यात आल्या. तर आज दि(१७मे२०२०)रोजी २ बसेसच्या माध्यमातून हिमाचल येथील ३२ प्रवाश्यांना पुणे येथून रेल्वेने जाण्यासाठी सोडण्यात आले आहे. त्याच बरोबर आज १६ बसेसच्या माध्यमातून तामिळनाडू येथील ४१२ प्रवाश्यांना पुणे येथून रेल्वेने जाण्यासाठी रविवारी रात्री ९.१५ वाजता महामार्ग बस स्थानक येथून सोडण्यात आले आहेत. या सर्व प्रवाश्यांसोबत दोन दिवस पुरेल असे टिकाऊ अन्नपदार्थ सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून देण्यात आले आहे. अशी माहिती नाशिक महानगरपालिकेच्या समन्वय अधिकारी तथा उप आयुक्त समाज कल्याण, नाशिक महानगरपालिका नाशिक यांनी दिली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790