नाशिक: आणखी एकाला 5 लाखांना घातला गंडा; नकली सोने विक्री प्रकरण

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): शहरातील उद्योजकाला खोदकाम करताना सापडलेले सोने विक्री करताना नकली सोने देत गंडा घातल्याप्रकरणी अटक केलेल्या टोळीचे आणखी कारनामे उघड होऊ लागले आहे.

पंचवटीतील चहा विक्रेत्याला २ लाख तर, नाशिकरोडच्या एकाला एक लाखांना गंडा घातल्याचे समोर आल्यानंतर आता शहरातील एका पानटपरी चालकाला या टोळीने नकली सोने देत ५ लाखांना गंडविल्याचे उघडकीस आले आहे.

दरम्यान, याप्रकरणी संशयितांच्या साथीदारांचा शोध घेण्यासाठी गुन्हेशाखेची पथके राजस्थानकडे रवाना झाली आहेत. शहरातील एका पानटपरी व्यावसायिकांकडे संशयितांची साथीदार गेले होते. पानटपरी चालकालाही खोदकामात जुन्या सोन्याच्या माळा सापडल्याचे सांगत, त्यांचीही हातचलाखीने दोन सोन्याचे मणी तपासण्यासाठी दिले.

हे ही वाचा:  नाशिक: शेअर्स ट्रेडिंगचे आमिष दाखवून लिंक पाठवत ३९ लाखांना गंडा

पानटपरी चालकाने ते मणी सराफाकडून तपासून घेतले. त्यानंतर संशयितांनी नकली सोन्याचे दागिनेच पानटपरीचालकासमोर ठेवले. कमी किंमतीत विकायचे असल्याचे सांगत ५ लाखांत व्यवहार झाला. पानटपरी चालकाने त्याच्या घरातील सर्व सोने विकून पाच लाख रुपये जमा केले आणि संशयितांना देत त्यांच्याकडील सोन्याचे दागिने घेतले.

संशयित पसार होताच, पानटपरीचालकाने सोन्याच्या दागिण्यांची पुन्हा तपासणी केली असता, ते सर्व दागिने नकली असल्याचे निदर्शनास आल्यावर त्याच्या पायाखालची वाळूच सरकली. परंतु फसवणूक झाल्याने बदनामी होईल या भितीपोटी पानटपरीचालकाने पोलिसात तक्रार दिली नाही. परंतु संशयित अटक झाल्याचे समजताच त्याने गुन्हेशाखेत धाव घेत आपबिती सांगितली.

शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकच्या पथकाने गेल्या गुरुवारी (ता. २५) रात्री तवली फाटा परिसरातून केशाराम पिता सवाराम (रा. बागरियोका वास, रानीवाडा, जि. सांचोर, राज्यस्थान), बाबुभाई लुंबाजी मारवाडी (रा. आदीवाडा, मारवाडीवास, गांधीनगर, गुजरात), रमेशकुमार दरगाराम (रा. बागरा, जि. जालोर, राज्यस्थान) यांना अटक केली होती.

हे ही वाचा:  शेल्टर -2024 ला  उदंड प्रतिसाद; सुट्टीचे औचित्य साधून आज साईट व्हिजिटचे अनेकांचे नियोजन !

संशयितांनी त्याच दिवशी एका उद्योजकाला नकली सोन्याच्या माळा देत २० हजारांना गंडा घातला होता. याप्रकरणी पोलिसांनी संशयितांचा तवली फाट्यापर्यंत पाठलाग करीत अटक केली. गुन्हा दाखल होताच पंचवटीतील चहा विक्रेता व नाशिकरोडचे एक व्यावसायिक असे दोघांच्याही तक्रारी पोलिसांकडे आल्या आहेत.

अर्ध्या तासात पसार:
शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकच्या पथकाने तिघा संशयितांना अटक केल्यानंतर तवली फाटा परिसरात असलेल्या संशयितांच्या पालाच्या ठिकाणी जाऊन मुद्देमाल जप्त केला. संशयितांनी चौकशीसाठी आणल्यानंतर पोलिसांचे दुसरे पथक पंचनामा करण्यासाठी पुन्हा तवली फाटा परिसरात पोहोचले असता, संशयितांचे साथीदार, कुटूंबिय पसार झाले होते. अवघ्या अर्धा तासामध्ये सदरचा प्रकार घडला.

हे ही वाचा:  नाशिक: 'सावाना'तर्फे आज 'स्वर सावाना'त संवादिनी, मोहनवीणा, तबला वादन

पथके रवाना:
संशयितांची टोळी ही महिनाभरापासून नाशिकमध्ये आहे. या दरम्यान संशयितांनी अनेकांना ऐतिहासिक नाणे, नकली सोन्याचे दागिन्याची बतावणी करून अनेकांना गंडा घातल्याची शक्यता आहे. आत्तापर्यंत चार गुन्ह्यांची उकल झाली आहे. तर संशयितांचे साथीदार हे राजस्थानकडे पसार झाले आहेत. त्यांना अटक करण्यासाठी गुन्हेशाखेची पथके राजस्थानकडे रवाना करण्यात आली आहेत.

”नागरिकांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये. आमिष दाखवून सोने विक्री करण्यासाठी कोणी आल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा.”-विजय ढमाळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, शहर गुन्हेशाखा युनिट एक.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790