नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): म्हसरूळच्या बोरगड परिसरामध्ये राहणाऱ्या संशयित पत्नीने पतीला बिअर पाजून सर्पमित्राच्या मदतीने त्याच्यावर हल्ला केला होता.
तसेच, बेदम मारहाण करतानाच सर्पदंश करून मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयित पत्नीसह तिची मैत्रिणी व सर्पमित्राला पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने तिघांना येत्या सोमवारपर्यंत (ता.५) पोलीस कोठडी सुनावली आहे.
बोरगड परिसरात राहणाऱ्या विशाल पाटील यांच्यावर गेल्या शनिवारी (ता. २७) रात्री प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली होती. एकता पाटील असे संशयित पत्नीचे नाव असून, सर्पमित्र चेतन प्रवीण घोरपडे (२१), माधुरी संतोष कुलकर्णी (दोघे रा. लातूर) असे अटक करण्यात आलेल्या तिघा संशयितांची नावे आहेत.
संशयित पत्नी एकता हिने पती विशाल यास बिअर पाजल्यानंतर संशयित सर्पमित्र घोरपडे याने बेदम मारहाण केली. तसेच त्याने आणलेल्या विषारी जातीचा साप विशाल याच्या गळ्यात टाकला.
त्यावेळी सापाने त्यांच्या गळ्यावर दंश केला. संशयित पत्नी एकता हिनेही पती विशालला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. परंतु विशाल यांनी दोघांच्या तावडीतून सुटका करून घेत मित्राच्या मदतीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालय गाठले.
त्यामुळे सदरील प्रकारचा उलगडा झाला. या मारहाणीतच विशाल पाटील याच्या हाताचे हाड फॅक्चर झाले असून, अतिविषारी सापाने दंश केल्याचाही दुष्परिणाम झाला आहे.
याप्रकरणी म्हसरूळ पोलिसांनी संशयितांचा माग काढून लातूरमध्ये संशयित एकता पाटील हिच्यासह तिची मैत्रिण माधुरी, सर्पमित्र चेतन या तिघांना अटक केली. तिघांना गुरुवारी (ता.१) न्यायालयात हजर केले असता, सोमवारपर्यंत (ता.५) पोलीस कोठडी सुनावली आहे.
मालमत्तेवरून वाद:
संशयित एकता पाटील ही पती विशाल याच्याशी मालमत्तेवरून वाद घालत असे. विशालच्या नावावरील मालमत्ता तिच्या नावार करण्यासाठी ती तगादा लावत होती. त्यातूनच त्यांच्या वाद होत होते.
मैत्रिण माधुरी हिच्याशी एकताची जवळीक होती. घर सोडून ती लातूर येथे माधुरीकडेच जाऊन राहत होती, असे पोलीस चौकशीतून समोर आले आहे.