नाशिक: धरणसमूहात केवळ 21 टक्के पाणी; नाशिक शहरावर दाटले पाणी कपातीचे ढग

…आठवडाभरात चांगला पाऊस झाल्यास कपात टळणार

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणसमूहात गेल्या आठवड्यात दोन दिवस झालेल्या पावसाने एक टक्का पाणीसाठा वाढला असला तरी पुन्हा पावसाने तीन दिवसांपासून ओढ दिली आहे. येत्या आठवडाभरात जोरदार पाऊस न झाल्यास शहरावर पाणी कपातीचे ढग दाटण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

यासंदर्भात, महापालिकेकडून जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव सादर केला जाणार असून यावर पालकमंत्री नेमकी काय भूमिका घेणार याकडे यंत्रणेसह लोकप्रतिनिधींचे लक्ष लागले आहे. सद्यस्थितीत धरणसमूहात अवघा २१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

अल निनोमुळे यंदा जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस लांबणार असल्याची शक्यता आधीच प्रशासनाने वर्तविली होती. त्यानुसार जिल्हा व मनपा प्रशासनाने नागिरकांना पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन केले होते. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणसमूहात ३१ जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा असल्याने त्यानुसार धोरण ठरविण्यात आले होते.

त्यातच जून महिन्याच्या अखेरीपर्यंत पावसाने हजेरी न लावल्याने प्रशासनासह लोकप्रतिनिधी, नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले होते. एकीकडे प्रशासनाकडून आठवड्यातून सुरुवातीला एक दिवस तर त्यानंतर आढावा घेऊन पाऊस लांबल्यास दोन दिवस पाणी कपातीचा निर्णय घेण्याची तयारी सुरू केली होती. यासंदर्भात, मनपा प्रशासनाने पाणी कपातीचे संकेत देत प्रस्तावदेखील तयार केला होता.

अल निनोच्या प्रभावामुळे पावसाळा लांबण्याचा किंवा त्यात खंड पडण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचा सल्ला देत मनपासह सर्वच पाणीवापर संस्थांनाही कपातीचे संकेत देण्यात आले होते. त्यानुसार गेल्या आठवड्यातील पावसाने जिल्ह्यासह शहरालाही काहीसा सकारात्मक दिलासा दिला असला तरी त्यात सातत्य नसल्याने पुन्हा पाणी जपून वापरावे लागणार आहे.

जिल्ह्यातील धरणांत यंदा गेल्या वर्षापेक्षा २ % अधिक पाणीसाठा:
नाशिक तालुक्यासह जिल्ह्यातील २४ लहान मोठ्या प्रकल्पांत मिळून गेल्या आठवड्यात झालेल्या पावसाने ४ टक्के पाणी वाढले आहे. शुक्रवारी १३९०१ दलघफू म्हणजे २१ टक्के इतका साठा होता. पुढील ४८ तासांत त्यामध्ये २३४६ दलघफूने वाढ होत तो १६२४७ दलघफू म्हणजे २५ टक्के इतका झाला आहे. गतवर्षी याच वेळी तो १५२२१ दलघफू म्हणजे २३ टक्के इतका होता. म्हणजे गतवेळपेक्षाही २ टक्के अधिक पाणी उपलब्ध झालेले आहे. मात्र पावसाने ओढ दिल्याने पाणीसाठा जैसे थे आहे. त्यामुळे नाशिक शहरासह ग्रामीण भागातही पाणीटंचाईचे सावट कायम आहे.

आताच्या पावसाने एक टक्का वाढ:
धरणसमूहातील पाणीसाठा अवघा २० टक्क्यांपर्यंत खाली येऊन चर खोदण्याची तयारी प्रशासनाने केली होती. मात्र, जून महिन्याच्या अखेरीस २८ ते ३० तारखेच्या कालावधीत त्र्यंबेकश्वर तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याने २ दिवसांतच तब्बल १३७ दलघफू म्हणजे एक टक्का पाणीसाठा वाढला आहे. शुक्रवारी धरणात २०२० दलघफू म्हणजे २० टक्के पाणी समूहात होते. या पावसामुळे पाणी कपातीचे संकट कायमच टळून धरणसाठ्यात पाणी वाढ होईल, अशी शक्यता वर्तविली जात होती. परंतु गेल्या तीन दिवसांपासून पुन्हा पावसाने आेढ दिल्याने अशीच परिस्थिती आठवडाभर राहिल्यास प्रशासनाला पाणी कपातीचा निर्णय घ्यावा लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

नाशिकसह मध्य महाराष्ट्रात आजपासून पावसाचा जोर:
राज्यामध्ये बुधवार, ५ जुलै ते ८ जुलैपर्यंत नाशिकसह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि कोकणात जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला आहे. मंगळवारी बहुतांश ठिकाणी ढग दाटून आले नसल्याने उन्हाची तीव्रता वाढलेली होती. दमट वातावरणामुळे नागरिकांना उकाड्याचाही सामना करावा लागत होता. मराठवाड्यातील परभणी येथे जोरदार पाऊस झाला.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790