नाशिक (प्रतिनिधी): शहरातील सातपूर परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याबरोबरच सर्व सण-उत्सव शांततेत पार पडावे यासाठी सातपूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंकज भालेराव यांनी कारवाईचा बडगा उगारण्यास सुरवात केली असून आठ महिन्यात १५ जणांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली असून, गणेशोत्सव व ईदच्या पार्श्वभूमीवर चार जणांना दहा दिवसांसाठी तडीपार करण्यात आले आहे.
दरम्यान, दोन जणांवर एमपीडीए तर ८ जणांविरोधात मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली.
सातपूर परिसरात शांतता प्रस्थापित राहण्याबरोबरच नागरिकांना भयमुक्त जीवन जगता यावे यासाठी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी कंबर कसली आहे. गणेशोत्सव व ईदच्या पार्श्वभूमीवर परिसरात अशांतता पसरविण्यास कारणीभूत ठरणाऱ्या १२९ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या १५ जणांविरोधात तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. यात लक्ष्मण ऊर्फ बादशाह गुंबाडे (वय ३५, रा. पिंपळगाव बहुला), राहुल इंगळे (वय २९, रा. अशोकनगर), मुकेश मगर (वय २४, जाधव संकुल, अशोकनगर), कुणाल चव्हाण (वय २६, अशोक नगर ), निखिल पवार (वय २२, पिंपळगाव बाहुला), संतोष विठ्ठल पालवे (वय ३२, प्रबुद्धनगर सातपूर), आकाश भाऊसाहेब महाले (वय २१, वाढोली) यांचा समावेश आहे.
अक्षय पाटील याच्याविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी (एमपीडीए) अंतर्गत कारवाई करण्यात आली असून एका जणांचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
गोळीबार प्रकरणी ८ जणांना मोक्का:
सातपूर एमआयडीसीत भरदिवसा तपन जाधव या युवकावर गोळीबार केल्याप्रकरणी आशिष जाधव, अक्षय भारती, गणेश जाधव, किरण चव्हाण, चेतन इंगळे, सोमनाथ ऊर्फ सनी झांजर, भूषण पवार, रोहित अहिरराव या ८ जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.