नाशिक (प्रतिनिधी): दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण लक्षणीय वाढते आहे. पोलिसांकडून वाहतूक नियमांबाबत सातत्याने प्रबोधनात्मक जनजागृती केली जाते. असे असतानाही शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत गेल्या सात महिन्यात ११३ अपघातांमध्ये १२२ वाहनचालकांचा बळी गेला आहे.
सुसाट वाहने चालविताना वाहतूक नियमांचेही सर्रास उल्लंघन होत असल्याने या अपघातांमध्ये हेल्मेट नसल्याने १७ दुचाकीस्वारांना आपला जीव गमवावा लागला आहे.
जानेवारी ते जुलै अखेरपर्यंत ११३ अपघातांचे गुन्हे विविध पोलिस ठाण्यांमध्ये दाखल झाले आहेत. या अपघातांमध्ये १२२ जणांचा बळी गेलेला आहे. रस्ता अपघातांमध्ये घट व्हावी यासाठी जागोजागी सिग्नल यंत्रणा, वाहनांचा वेगाच्या सूचनांसह गतिरोधकही बसविलेले आहे. तसेच, शहर वाहतूक पोलिस विभागाकडून ठिकठिकाणी नाकाबंदी करीत, हेल्मेट व सीटबेल्टची कारवाईही केली जात आहे.
असे असताना, गेल्या सात महिन्यांमध्ये दुचाकींच्या अपघातामध्ये १२२ जणांचा बळी गेला आहे. यातील १७ दुचाकीस्वारांनी हेल्मेट परिधान केलेले नव्हते, असे तपासातून समोर आले आहे. त्याचप्रमाणे, याच काळात विविध कारणातून सात महिन्यात २८८ अपघातांची नोंद वाहतूक शाखेकडे आहे. यात सर्वाधिक १३० अपघात हे अतिवेगाने वाहन चालवण्याचे आहेत. तर, ११४ अपघात हे धोकादायकरीत्या वाहन चालविण्याचे आहेत.
२० विनाहेल्मेट तर, दोन अपघात हे ड्रिंक ॲन्ड ड्राईव्हचे आहेत. गेल्या महिन्यांत सातपूर हद्दीत एका अल्पवयीन शालेय विद्यार्थ्यांचा सकाळी-सकाळी क्लासला जाताना दुभाजकाला धडकून मृत्यू झाला होता. तर दुसऱ्या दिवशी अशोक स्तंभावर मोपेड घसरून बारावीच्या मुलाचा मृत्यू झाला होता. बाईक धूमस्टाईल पळविण्यानेच अपघातात वाढ झाल्याचा निष्कर्ष आहे.