पुणे। दि. २३ जुलै २०२५: इयत्ता अकरावीच्या तिसऱ्या नियमित फेरीअंतर्गत विद्यार्थ्यांना अर्जाचा भाग दोन भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. या अंतर्गत विद्यार्थ्यांना अकरावीच्या प्रवेशासाठी महाविद्यालयांचा प्राधान्यक्रम बुधवारपर्यंत (ता. २३) देता येणार आहे. या फेरीची निवड यादी शनिवारी (ता. २६) जाहीर होणार आहे.
राज्यातील नऊ हजार ११ कनिष्ठ महाविद्यालयांतील २१ लाख ४१ हजार ४३० जागांवरील प्रवेशासाठी केंद्रीय ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत आहे. अकरावीच्या प्रवेशासाठी १४ लाख १९ हजार ८६१ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे.
‘कॅप’ फेरीअंतर्गत १७ लाख ६६ हजार ३७ जागांवर आतापर्यंत सहा लाख चार हजार ४०६ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. तर, कोट्याअंतर्गत तीन लाख ७५ हजार ३९३ जागांपैकी एक लाख १६ हजार २६० जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे.
तिसऱ्या नियमित फेरीचे वेळापत्रक (कालावधी : तपशील):
२३ जुलै (सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत) : प्रवेशासाठी नवीन विद्यार्थी नोंदणी आणि भाग एकमध्ये दुरुस्ती करणे, अर्जाचा भाग दोन भरणे, महाविद्यालयांचा प्राधान्यक्रम देणे.
२६ जुलै : तिसऱ्या नियमित फेरीसाठी अलॉटमेंट जाहीर करणे, विद्यार्थी आणि महाविद्यालय लॉगिनमध्ये तपशील दर्शविणे, विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारे संदेश पाठविणे, महाविद्यालयांचा कट-ऑफ जाहीर करणे.
२६ ते २८ जुलै : विद्यार्थ्यांनी मिळालेल्या महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करणे, प्रवेशासाठी ‘प्रोसिड फॉर ॲडमिशन’वर क्लिक करणे, प्रवेश घेणे, प्रवेश रद्द करणे, प्रवेश नाकारणे.
३० जुलै : रिक्त जागांचा तपशील प्रदर्शित करणे.