एक कोटीच्या लाच प्रकरणातील अभियंता गणेश वाघवर लुक आऊट नोटीस जारी !

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): एमआयडीसीतील पाईपलाईनच्या कामाचे २ कोटी ६६ लाख ९९ हजार २४४ रूपयांचे बिल काढण्यासाठी एक कोटी रुपयांची लाच घेण्यात सहभागी असलेल्या कार्यकारी अभियंता गणेश वाघ याच्या शोधासाठी पोलिसांचा आटापिटा सुरू असताना आता त्याचे कुटुंबीयही बेपत्ता झाल्याचे समोर आले आहेत.

वाघ याच्या शोधासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक कार्यालयाने ‘लूकआऊट नोटीस’ काढली आहे. दरम्यान, वाघ फरार झाल्याच्या दिवसापासून वाघ याचे कुटुंबिय देखील बेपत्ता आहे.

वाघ याच्या शोधासाठी लाचलुचपत विभागाची चार पथके कार्यरत आहेत. वाघ याच्या धुळे येथील कार्यालयात, तसेच पुणे, बुलडाणा आणि छत्रपती संभाजीनगरमधील निवासस्थानी चौकशी करण्यात आली. वाघ याचे कुटुंबीयही बेपत्ता आहेत. वाघ परदेशात जावू शकतो. त्यामुळे त्याच्याविरोधात लूक आऊट नोटीस काढण्यात आली आहे.

नक्की काय घडलं होतं:
अहमदनगर येथील महाराष्ट्र औद्योगिक प्रदेश औद्योगिक विकास महामंडळाच्या सहाय्यक अभियंता यास तब्बल १ कोटींची लाच घेताना नाशिक येथील प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी रंगेहात पकडले. अमित गायकवाड (३२) असे या सहाय्यक अभियंत्याचे नाव आहे. याप्रकरणी नागापूर एमआयडीसी पोलीस ठाण्यात शनिवारी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला. गायकवाड यांनी ही लाच स्वतःसाठी तसेच तत्कालीन उपविभागीय अभियंता गणेश वाघ याच्या करीता स्वीकारल्याचे चौकशीत समोर आले. त्यानंतर दोघांविरोधात कारवाई करण्यात आली.

पाईपलाईन टाकण्याचे कामाचे २ कोटी ६६ लाख ९९ हजार २४४ रूपयांचे बिल मिळावे म्हणून ही लाच मागण्यात आली होती. ती स्विकारतांना गायकवाड हे एसीबीच्या जाळ्यात अडकले. या कामाच्या बिलांवर तत्कालीन उपविभागीय अभियंता गणेश वाघ याच्या मागील तारखेचे आउटवर्ड करुन त्यावर त्याच्या सह्या घेऊन हे देयक पाठविण्याचे मोबदल्यात गायकवाड याने स्वतःसाठी तसेच वाघ याच्या करीता या बिलाचे कामाचे व यापूर्वीच्या अदा केलेल्या काही बिलांची बक्षिस म्हणून १ कोटी रूपये लाचेची मागणी केल्याची तक्रार छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय ठेकेदार यांनी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती.

त्यानंतर नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या पथकाने नगर शहराजवळ सापळा रचून ही कारवाई केली. शुक्रवारी दुपारी नगर – संभाजीनगर महामार्गावरील शेंडी शिवारात आनंद सुपर मार्केट बिंल्डिंगच्या बाजुला सापळा लावला. त्यात हे अधिकारी अडकले. या लाचेची १ कोटी रुपये अमित गायकवाड यांनी इनोव्हा कारमध्ये पंच, साक्षीदारांसमक्ष स्विकारली. त्याचवेळी गायकवाड याने त्याच्या मोबाईलवरुन तत्कालीन उपविभागीय अभियंता गणेश वाघ यांना फोन करून लाचेची रक्कमेबाबत माहिती दिली. त्यात त्यांच्या झालेल्या बोलण्यावरुन त्यांचा सहभागही सिध्द झाला. त्यानंतर याप्रकरणी नागापूर एमआयडीसी पोलीस ठाण्यात शनिवारी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790