नाशिक (प्रतिनिधी): आनंदवलीतील रमेश मंडलिक खून हा कॉन्ट्रॅक्ट किलिंगने झाल्याचे उघडकीस अाले आहे. तब्बल ३० लाखांची सुपारी आणि दहा गुंठे प्लॉट देण्याचे कबूल करत हा खून केला असल्याचे पोलिस तपासात पुढे आलेे. होमगार्ड गणेश काळे यानेच गळा चिरून खून केला तर भगवान बाळू चांगले याने पाळत ठेवल्याचे निष्पन्न झाले.
भूमाफियाकडून प्रथमच कॉन्ट्रॅक्ट किलिंगचा फंडा वापरला. मात्र कॉन्ट्रॅक्टमध्ये पैसे कोण देणार होता याचा तपास गंगापूर पोलिस करत आहेत. आजपर्यंत १२ संशयितांना अटक करण्यात आली असून १ मार्चपर्यंत पोलिस कोठडीत वाढ झाली आहे.
याप्रकरणी पोलिस उपायुक्त अमोल तांबे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली, आनंदवलीतील रमेश मंडलिक यांच्या खूनप्रकरणी सचिन मंडलिक, अक्षय ऊर्फ अतुल मंडलिक, भूषण मोटाकरी, सोमनाथ मंडलिक, दत्तात्रय मंडलिक, नितीन खैरे, आबासाहेब भडांगे, भगवान चांगले, बाळासाहेब कोल्हे, गणेश काळे, वैभव वराडे, सागर शिवाजी ठाकरे या संशयितांना अटक केली आहे. चौकशीत भगवान चांगले आणि गणेश यांना ३० लाखांची सुपारी देण्यात आली होती. इतर नातेवाइकांनी या दोघांस रमेश मंडलिकबाबत माहिती देत असल्याचे तपासात पुढे आले. वरिष्ठ निरीक्षक अंचल मुदगल, नितीन पवार, प्रवीण सुर्यवंशी, सचिन शेंडकर, सचिन सुफले, भारत बोळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.