नाशिक (प्रतिनिधी) : चांदवड तालुक्यातील दुगाव गावातील ९ वर्षीय बालकावर १५ ते २० रोगग्रस्त मोकाट श्वानांनी हल्ला केला. या हल्ल्यादरम्यान बालक गंभीर जखमी झाला असून त्याला एक पाय गमवावा लागला आहे.
अनिकेत सोनवणे हा ९ वर्षीय बालक दुगाव येथे मित्रांसोबत खेळत असताना त्याच्यावर अचानक मोकाट श्वानांनी हल्ला केला. यादरम्यान जवळच्या शेतात काम करत असणाऱ्या शेतकऱ्यांनी कुत्र्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकला. शेतकरी तातडीने आवाजाच्या दिशेने गेले असता अनिकेत रक्ताने माखलेल्या अवस्थेत दिसून आला. गावकऱ्यांनी बराच वेळ कुत्र्यांना हाकलण्याचा प्रयत्न केला. लाठी मारून कुत्र्यांना पळवून लावत जखमी अनिकेतला वाचवले.
याप्रकरणी गावकऱ्यांकडून संताप व्यक्त होत असून या मोकाट श्वानांनी उच्छाद मांडला आहे. तरी याबाबत तातडीने दखल घ्यावी व लवकरात लवकर कारवाई करावी. अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयात श्वान सोडून आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांना दिला आहे. शहरातील भटके श्वान हे चांदवड भागात लोकवस्तीजवळ सोडण्यात येतात. त्यामुळेच हा प्रसंग ओढवला आहे. तरी ठेकेदाराची चौकशी करून ठेका रद्द करावा. तसेच शासनाने व ठेकेदाराने रुग्णालयात येणाऱ्या खर्चाची भरपाई द्यावी. अशी मागणी देखील करण्यात येत आहे.