हृदयद्रावक: तीन वर्षाच्या चिमुकल्याची हत्या करून आईची आत्महत्या !
नाशिक (प्रतिनिधी): पाथर्डी फाटा परिसरातील राहत्या घरात एका महिलेने गळफास घेत आत्महत्या केली असून पोलिसांना साडेतीन वर्षीय मुलाचा देखील मृतदेह घरात आढळून आला आहे. दरम्यान, मुलाचा खून करून महिलेने आत्महत्या केली असावी अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिखा सागर पाठक वय (32 रा साई सिद्धी अपार्टमेंट पाथर्डी फाटा) सोमवार (दि. 9 ऑगस्ट २०२१ रोजी) यांनी त्यांच्या राहत्या घरात आई-वडील हॉलमध्ये बसलेले असताना बेडरूमचा दरवाजा बंद करून गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी मुलगा रिधानचा उशीने गळा दाबून खून केला असल्याचा प्रथमदर्शनी अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, घटनास्थळी गेल्यानंतर महिलेने गळफास घेतलेला दिसला. हा प्रकार घडायच्या आधी सदर महिला बेडरूममध्ये तिच्या मुलाचा अभ्यास घेत होती. यावेळी बेडरूमचा दरवाजा लावलेला होता. यावेळी त्या महिलेचे आई आणि वडील जे कर्नाटकहून तिला भेटायला आले होते ते हॉलमध्ये बसले होते आणि पती कामावर गेले होते. चार वाजण्याच्या सुमारास जेव्हा तिच्या आई वडिलांनी दरवाजा वाजवला त्यावेळी आतून कुठलाही प्रतिसाद आला नाही. त्यामुळे त्यांनी आपल्या जावयाला म्हणजेच मृत महिलेच्या पतीला ऑफिसमधून घरी बोलावून घेतले. ते आल्यानंतर त्यांनी बेडरूमचा दरवाजा तोडला. आत गेल्यानंतर सदर महिला ही पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. बाजूलाच बेडवर त्यांचा साडेतीन वर्षाचा मुलगासुद्धा मृत अवस्थेत आढळून आला. पोस्टमॉर्टेम मध्ये मुलाचा मृत्यू हा श्वास गुदमरून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे कदाचित उशीच्या सहाय्याने नाक दाबून चिमुकल्याची हत्या केली असावी असा अंदाज आहे.
मृत्युपूर्व महिलेने चिट्ठी लिहून ठेवली होती, यात कुणालाही दोष देऊ नये असे म्हंटले आहे. महिलेच्या आई वडिलांचीही कुणाबद्दल काही तक्रार नाही. पोलिसांनी शेजाऱ्यांकडे चौकशी केली असता, कुटुंब चांगले आहे असे समजले. मात्र मृत महिला ही काहीशी तापट स्वभावाची असल्याचे शेजाऱ्यांनी आणि स्वत: महिलेच्या वडिलांनीही सांगितले. महिलेला मुलाकडून अभ्यासाच्या खूप अपेक्षा होत्या. त्यामुळे बेडरूम मध्ये अभ्यास घेत असतांना तिच्या मनाविरुद्ध काहीतरी घडलं आणि त्यातून हा प्रकार झाला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर ,पोलीस उपआयुक्त विजय खरात, सहायक आयुक्त सोहेल शेख घटनास्थळी त्वरित दाखल झाले.