नाशिक (प्रतिनिधी) : छत्तीसगडमधील विलासपूर येथे केंद्रीय राखीव पोलीस दलात उपनिरीक्षक म्हणून रमेश बागुल कार्यरत आहे. बागुल याने २२ तरुणांना सैन्यात नोकरी लावून देण्याचे आमिष देत ६० लाख रुपयांची फसवणूक केली आहे. यामुळे पाचोरा पोलिसांनी सापळा रचत नाशिक येथे त्याला अटक केली.
रमेश बागुल सुट्टीवर नगरदेवळा येथे आला असतांना त्याने सैन्य भरतीसाठी सराव करणाऱ्या तरुणांना विश्वासात घेत, नोकरी लावून देण्याचे आमिष दिले. तसेच नाशिक, धुळे व नगर या भागामधील तरुणांना देखील आमिष देत २२ तरुणांकडून, ६० लाख रुपये घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर नगरदेवळा येथील रवींद्र पाटील याने पाचोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु करत, नागपूर नंतर नाशिक येते ५ दिवस थांबून तपास सुरु ठेवला. दरम्यान अथक परिश्रमानंतर संशयित आरोपी बागुल याला सापळा रचून नाशिक येथे अटक केली. न्यायालयाने बागुल याला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकणात अजून मोठ्या व्यक्तींचे नाव समोर येण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.