सेलोटेपने हातपाय बांधून जबर मारहाण केली, नाशिक जिल्ह्यात पुन्हा सशस्त्र दरोडा
नाशिक (प्रतिनिधी): नाशिकसह जिल्ह्यात दरोड्याचे सत्र सुरूच असून सिन्नर तालुक्यात दुसरा दरोडा पडल्याची घटना घडली आहे.
त्यामुळे ग्रामीण भागात दरोडेखोरांची टोळी सक्रिय असल्याचे पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचे अधोरेखित झाले आहे.
नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील ढकांबे येथील दरोड्याची उकल अद्याप झालेली नसताना सिन्नर तालुक्यातील हुळहुळे वस्तीवर सशस्त्र दरोडा पडल्याची घटना उघडकीस आली आहे.
वडगाव पिंगळा गावात सात वाजेच्या सुमारास पाच ते सहा जणांच्या टोळक्याने दरोडा टाकला आहे. घरी असलेल्या मायलेकांना जबरी मारहाण करून घरातील पाच तोळे सोने व रोख रक्कम असा ऐवज लुटून नेला आहे. तोंड बांधून आलेल्या पाचते सहा दरोडेखोरांनी दोघा मायलेकांना बांधून ठेवत जबरी लूट केली आहे.
त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण असून पुन्हा सक्रिय दरोडेखोरांकडून मळे परिसरातील शेतकरी सावज केले जात आहेत.
सिन्नर तालुक्यातील वडगाव पिंगळा परिसरात हुळहुळे कुटुंब वास्तव्यास आहे. हे कुटुंबातील प्रमुख हे भाजीपाला विक्रीसाठी मार्केटला गेले होते. सायंकाळी सात वाजेच्या सुमारास हुळहुळे कुटुंबातील राहुल आणि त्याची आई दोघेच घरात होते. अशातच कोयते चाकू हातात घेऊन सहा सात दरोडेखोर घरात घुसले. ओरडण्याचा आतच त्यानिशी सर्व हातपाय सेलोटेपने बांधून टाकले. त्यामुळे हालचाल करणे शक्यच नव्हते. मात्र आम्ही हालचाल करून आवाज देण्याच्या प्रयत्न करत असताना दरोडेखोरांनी जबर मारहाण केली. त्याचबरोबर कपाटातील पाच तोळे सोन्यासह 25 ते तीस हजारांची रक्कम चोरून नेली. तसेच ते घराबाहेर पडताना कानातील ओरबाडून नेल्याने कानाला गंभीर दुखापत झाल्याची आपबिती हुळहुळे कुटुंबातील महिलेने सांगितली.
हुळहुळे कुटुंबातील राहुल हा सध्या पोलीस भरतीसाठी तयारी करत असून त्याला देखील दरोडेखोरांनी जबर मारहाण केल्याचे त्याने सांगितले. कोयते आणि चाकू हातात असलेले दरोडेखोर हिंदी बोलत होते. त्यांना म्हणालो कि, तुम्हाला काय पाहिजे ते काढून घ्या पण आम्हाला सोडून द्या.’ मात्र त्यांनी अधिकच मारहाण केली.