नाशिक (प्रतिनिधी) : सिन्नर तालुक्यातील अनेक भागात कोरोनाचा शिरकाव झाला असला तरी सिन्नर ग्रामीण रुग्णालयाने केलेले योग्य नियोजन आणि तत्काळ उपचारांमुळे आतापर्यंत ३९८ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच सेंट्रल ऑक्सिजन लाईनमुळे अनेकांचे प्राण वाचविण्यात येथील आरोग्य विभागाला यश आले आहे.
सिन्नर येथील कोविड सेंटरमधून आज २९ जुलै रोजी यशस्वी उपचारानंतर १९ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून लवकरचं ५०० रुग्णांना देखील लवकरच डिस्चार्ज देण्यात येणार असल्याचे वैद्यकिय अधिक्षक डॉ.निर्मला गायकवाड यांनी सांगितले. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव, डॉ. प्रशांत खैरनार, डॉ.संजय वळवे, रुग्णालयातील सर्व स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते.
शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार उपचार पध्दती
कोरोनावर अनेक उपाय आणि आयुर्वेदिक पद्धतीबाबत सध्या चर्चा सुरू आहे. मात्र सिन्नर येथील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय पथकाने कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या पद्धतीचाच अवलंब केला. त्यामुळेच आज सिन्नरची वाटचाल कोरोनामुक्त तालुक्याकडे सुरू आहे.
रुग्णांसाठी चांगल्या दर्जाची आहार व्यवस्था सिन्नर येथे रुग्णांसाठी ६० खाटांची व्यवस्था असलेली अद्यावत नवीन इमारत असून त्यात रुग्णांसाठी उत्कृष्ट स्वच्छतेची व्यवस्था, जैव वैद्यकिय कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यात आले. रुग्णांसाठी प्रथिनांनी युक्त्त चांगल्या दर्जाची आहार व्यवस्था त्यामध्ये दूध, अंडी, गरम पाणी आणि काढा देण्यात आला.