नाशिक (प्रतिनिधी) : कोरोनाचे सावट असतांनाच, बर्ड फ्लूने देखील राज्यात शिरकाव केला आहे. त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. यातच सुरगाणा तालुक्यातील उंबरदे येथे १० कावळ्यांचा एकाच वेळी मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्हा पशुसंवर्धन विभागाची तारांबळ उडाली आहे.
राज्यात बर्ड फ्लूने शिरकाव केल्याने शासनाने योग्य खबरदारी घेण्याचे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार, जिल्हा परिषद प्रशासनाने २८ रॅपिड रिस्पॉन्स टीम तयार केल्या आहेत. दरम्यान, टीमकडून सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. मंगळवारी (दि.१२ जानेवारी) रोजी सकाळी सुरगाणा तालुक्यातील उंबरदे येथे १० कावळे एकाच वेळी मृत्यूमुखी पडले. ही माहिती मिळताच, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विष्णु गर्जे व त्यांच्यासोबत रॅपिड रिस्पॉन्स टीमने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, मृत कावळ्यांचे नमुने ताब्यात घेऊन, ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले. तसेच १-२ दिवसात कावळ्यांच्या मृत्यूचे कारण समोर येईल, असे डॉ. गर्जे यांनी सांगितले आहे.