शिवसेना, सत्कार्य फाऊंडेशनसह रहिवाशांची मागणी
नाशिक (प्रतिनिधी): सिटी सेंटर मॉल सिग्नलवरील भिकारी, खेळण्यांसह विविध वस्तू विक्रेते आणि त्यांनी फुटपाथवर थाटलेल्या झोपड्या हटवाव्यात, अशी मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे.
शिवसेना, सत्कार्य फाऊंडेशनच्या पुढाकाराने याबाबतचे निवेदन महापालिका आयुक्त आणि महापालिका सिडको विभागीय अधिकार्यांना देण्यात आले आहे.
सिग्नलच्या पुलाजवळ खेळणी विक्रेते व भिकारी यांनी फुटपाथवरच झोपड्या थाटल्या आहेत. रस्त्यावरच ते शौचाला जातात, अंघोळ करतात, कचर्याचे ढिग निर्माण करतात, यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते.
रोगराई निर्माण होण्याचा धोका आहे. त्यांच्यात जोरदार भांडणही होते. वस्तू विकण्यासाठी आणि मुलांना कडेवर घेवून भीक मागण्यासाठी या व्यक्ती वाहने अडवितात. यामुळे अपघात होण्याची व वाहनधारक दोष नसताना अडचणीत येण्याची शक्यता आहे. हे भिकारी व विक्रेते बर्याचदा रात्री व दिवसा परिसरातील गल्ल्यांमधून घरांसमोर फिरत असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. परिसरातील सुरक्षा, स्वच्छता आणि अतिक्रमणमुक्त फुटपाथसाठी त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी तिडकेनगर, प्रियंका पार्क, कर्मयोगीनगर, जगतापनगर, कालिका पार्क, दोंदे पूल परिसरातील रहिवाशांनी केली आहे.
शिवसेना आणि सत्कार्य फाऊंडेशनच्या पुढाकाराने आयुक्त कैलास जाधव, विभागीय अधिकारी मयुर पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. सत्कार्य फाऊंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), चारूशिला गायकवाड (देशमुख), शाखाप्रमुख बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, रवींद्र सोनजे, प्रभाकर खैरनार, डॉ. राजाराम चोपडे, मनोज पाटील, धवल खैरनार, संगिता देशमुख, मालती कोलते, कुलदीप कुलकर्णी, शेखर राणे, माधव मुसळे, संतोष कमानकर, रितेश पाटील, अतुल पवार, इंद्रनील सेठ, शुभदा पाटील, मेधा आहेर, दीपक जोंधळे, दीपक दुट्टे, बाळासाहेब राऊतराय, वंदना पाटील, कांचन महाजन, डॉ. अपर्णा राऊत, विजय गोसावी यांच्यासह शेकडो रहिवाशांनी ही मागणी केली आहे.