नाशिक (प्रतिनिधी): देशातील ५१ शक्तीपीठांपैकी स्वयंभू आद्यशक्तीपीठ असलेल्या वणी गडावरील सप्तशृंगी मातेच्या मूर्ती संवर्धन प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर विद्यमान विश्वस्त मंडळाने आता आदिमायेचे मंदिराचे सुशोभीकरण व सभामंडपाचे विस्तारीकरण करण्याचे काम हाती घेतले आहे. यामुळे मंदिराचे रूप पालटणार आहे.
भाविकांच्या योगदानातून पहिल्या टप्प्यात सुमारे सात कोटी रुपये खर्च करून मंदिर साकारण्यात येणार आहे. अक्षय तृतीयेला या कामाचा शुभारंभ होणार असल्याचे ट्रस्टतर्फे सांगण्यात आले आहे.
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले आद्यस्वयंभू शक्तिपीठ सप्तशृंगगडावर दरवर्षी सुमारे ४० ते ४५ लाख भाविक श्री भगवतीच्या दर्शनासाठी येतात. विश्वस्त संस्थेने भाविकांच्या सेवा-सुविधांतर्गत दर्शन व्यवस्थेसह अल्पदरात निवास व्यवस्था तसेच ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर अल्पदरात प्रसादालय भोजन व्यवस्था कार्यान्वित केली आहे.
विश्वस्त मंडळामार्फत नव्यानेच श्री भगवती मंदिर जीर्णोद्धाराचे काम व श्री भगवती मंदिर गाभारा चांदीचे नक्षीकाम हाती घेण्यात आले आहे. श्री भगवती मंदिर सभामंडपाच्या प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी मोठ्या प्रमाणात देणगी व निधी आवश्यक असून त्यासाठी भाविकांनी यथाशक्ती मदत करावी असे आवाहन विश्वस्त मंडळाने केले आहे. गाभाऱ्यात चांदीच्या नक्षी कामासाठी मोठ्या प्रमाणात चांदी अपेक्षित आहे. त्यात भाविक स्वेच्छेने योगदान देत आहेत.
ट्रस्टने १९८१ मध्ये श्री भगवती मंदिर सभामंडपाचे बांधकाम केले होते. मात्र ४२ वर्षांनंतर बांधकामातील नवीन तंत्रज्ञान तसेच संगणक प्रणालीवर आधारित अद्ययावत सेवा सुविधा कार्यान्वित करणे, भाविकांची वाढती संख्या, दर्शन नियोजन, अंतर्गत विद्युतीकरण, सीसीटीव्ही प्रणाली, दर्शनी भागाचे सुशोभीकरण करण्यासाठी मंदिराचा जीर्णोद्धार करणे गरजेचे आहे. त्याचा कार्यारंभ सोहळा अक्षय्य तृतीयेला दुपारी एकला केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार, पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली करण्याचे नियोजित आहे. आमदार नितीन पवार, जिल्हाधिकारी डी. गंगाथरन प्रमुख पाहुणे असतील अशी माहिती ट्रस्टतर्फे देण्यात आली आहे.
सभामंडपाचा विस्तार करणार:
वर्षभरातील चैत्र व नवरात्र उत्सव पौर्णिमा, मंगळवार, शुक्रवार व रविवार इत्यादी दिवशी भाविकांची प्रचंड गर्दी असते. गर्दीचे नियोजन व नियंत्रणासाठी अध्यक्ष व विश्वस्त मंडळाने श्री भगवती मंदिराचा सभामंडप विस्तार व सुशोभीकरण करण्याचे योजिले आहे. त्यासाठी किमान सात कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.