नाशिक (प्रतिनिधी): नाशिकमधील मुंबई-आग्रा महामार्गावरील राजीवनगर परिसरातील ज्युपिटर हॉटेलमध्ये विवाहसोहळा सुरु होता. दरम्यान, सप्तपदी विधी चालू असतांना नववधूचे १० लाख किंमतीचे दागिने व १ लाख रोकड चोरट्याने हातोहात लांबवली.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि.८ डिसेंबर) रोजी फिर्यादी सुरेश मदनलाल बजाज (वय,५५ रा.शहापूर) यांच्या मुलीचा विवाह विधी हॉटेलमध्ये सुरु होता. बजाज व त्यांची पत्नी सरोज सभागृहात मंचावर पुरोहितांच्या शेजारी बसलेले होते. त्यांच्याजवळ नववधूचे दागिने व रोकड असलेली लेडीस हॅन्ड बॅग जवळच पाठीमागे ठेवलेली होती. अज्ञात चोरट्याने नजर चुकवून ती बॅग घेऊन पोबारा केला. बॅग मध्ये सोन्याचा हार, एक सोन्याची अंगठी, सोन्याचे कानातले, डायमंडचा हार, गुजरात गोल्ड रिफायनरीचा शिक्का असलेली १० ग्रॅमची ५ नाणी, चांदीचे १० क्वाइन, सोन्याचा छोटा हार, १ लाख रोकड इत्यादी मौल्यवान ऐवज होता.