नाशिक (प्रतिनिधी) : खरीप हंगामासाठी विभागातील नाशिक, जळगांव, अहमदनगर, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात पीक कर्जाचे वाटप समाधानकारक झाले आहे. आजपर्यंत विभागात 5 लाख 28 हजार 703 हेक्टर क्षेत्रासाठी 7 हजार 123 कोटी पीक कर्जाचे वाटप झाले असून या पीक कर्जाचा लाभ विभागातील 7 लाख 73 हजार 438 शेतकऱ्यांना होणार असल्याची माहिती सहकार विभागाच्या विभागीय सहनिबंधक ज्योती लाठकर यांनी दिली आहे.
खरीप हंगाम 2020-21 करिता विभागातील एकूण उद्दीष्टे 11 हजार 151 कोटी 25 लाखाचे असून त्यापैकी 7 हजार 123 कोटी पीक कर्जाचे वाटप झाले आहे. संपूर्ण विभागात आत्तापर्यंत 63 टक्क्यापर्यंत कर्जवाटपाचे काम झाले आहे. कर्जवाटपात जिल्हा मध्यवर्ती बँकेने 93 टक्के इतके लक्षणीयअसे कर्जवाटप केले आहे. गेल्या वर्षीपेक्षा 23 टक्के अधिक कर्जवाटप झाले असल्याची माहितीही विभागीय सहनिबंधक श्रीमती लाठकर यांनी दिली आहे.
खरीप पीक कर्ज वाटपात 2 लाख 37 हजार 972 नियमित कर्जदार शेतकऱ्यांना 1 हजार 414 कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. तसेच महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्ज मुक्त योजनेतील 3 लाख 19 हजार 255 शेतकऱ्यांना 1 हजार 555 कोटी 41 लाखांचे कर्ज वाटप तर 17 हजार 901 नवीन सभासद झालेल्या शेतकऱ्यांना 60 कोटी 63 लाखांचे कर्ज वाटप करण्यात आली असल्याची माहिती श्रीमती लाठकर यांनी दिली आहे.
नाशिक जिल्ह्यात 1 लाख 17 हजार 419 शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप :
नाशिक जिल्ह्याला खरीप पीक कर्जाचे 3 हजार 303 कोटी रुपयांचे उद्दीष्टे देण्यात आले होते. त्यापैकी आत्तापर्यंत 2 हजार 300 कोटी रुपयांचे वाटप झाले असून पीक कर्ज वाटपाचे काम आत्तापर्यंत 70 टक्के झाले आहे. या पीक कर्जाचा लाभ 1 लाख 17 हजार 419 शेतकऱ्यांना झाला आहे.