नाशिक (प्रतिनिधी) : शहरातील बससेवा बंद करण्यासाठी महामंडळाने लाॅकडाऊन हे कारण पुढे केले असले, तरी महामंडळाने महापालिकेला याअगोदरही वेळोवेळी पत्रव्यवहार करून शहर बससेवा आमची जबाबदारी नाही असे सांगितले होते. महामंडळाकडून शहरी बससेवा चालवणे म्हणजे तोट्याचे आहे. असे सांगण्यात येत आहे. शहरातील बससेवा वर्षानुवर्ष याच प्रवाशांच्या भरोशावर होती. मात्र, आता महामंडळ प्रवाशांचा विचार न करता, सामाजिक बांधिलकी बाजूला ठेवून, व्यवहारिक वृत्तीने विचार करत असल्याचे दिसून येते.
१९९२ च्या अगोदरपासून राज्य परिवहन महामंडळ ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागांत सेवा पूरवत होते. परंतु, पूर्वी महामंडळांला नफ्या-तोट्याचे गणित कधी आठवले नाही. मात्र, आता शहर बससेवा ही आपली जबाबदारी नसून, महामंडळाकडून हात वर करण्यात आले आहेत. महामंडळाची सूत्रे उत्तमराव खोब्रागडे यांच्या हातात आहेत. तर त्यांनी थेट वृत्तपत्रात नोटीसा देऊन, आता बससेवा चालू होणार नसल्याचा इशाराही दिला आहे. परंतु, तत्कालीन सत्ताधारी आणि महापालिकेच्या राजकीय दबावामुळे त्यांच्या इशाऱ्याचा फारसा परिणाम झालेला नाही. शहरांमध्ये खाजगी वाहनांची संख्या वाढली आहे. म्हणून प्रवाशांच्या संख्येत घट होत आहे असे कारण सांगितले जाते. परंतु, प्रवाशांसाठीच बससेवा चालविणे ही मुळात महामंडळाची जबाबदारी आहे. तर दुसरीकडे महापालिकेच्या निर्णयाची वाट न बघताच शहरात बससेवा चालवण्यास नकार देणाऱ्या महामंडळाच्या कारभाराची दखल शासनाने घ्यावी अशी मागणी करण्यात येत आहे.