नाशिक (प्रतिनिधी) : शहरात महावितरणकडून अनेक परिसरात तासनतास वीज पुरवठा खंडित करण्यात येतो. तर दुसर्या बाजूला अतिदाबाने वीज पुरवठा होऊन, द्वारका परिसरात नागरिकांची लाखोंची वीज उपकरणे जळाली आहेत. यामुळे नागरिकांमध्ये याबाबत राग व्यक्त होत आहे. शहरात सोमवारी (दि.२६) रोजी विजेचा दाब अचानक वाढला.
यामुळे काठेगल्ली परिसरातील त्रिकोणी गार्डन, धवलगिरी, आकाशगंगा या सोसायट्यांमध्ये नागरिकांच्या घरातील विजेची उपकरणे जळाल्याने मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये पंखे, लॅपटॉप, टीव्ही, चार्जिंगला लावलेला मोबाइल तसेच घरातील दिवे देखील जळाले. याबाबत ग्राहकांनी ऑनलाइन तक्रार केली असता दुसऱ्या दिवशी सकाळी लाइनमनने विद्युत डीपीची पाहणी केली. मात्र,विजेचा दाब नेमका कशाने वाढला याचा शोध घेता आला नाही. तसेच या विभागाचे अभियंता व इतर कार्यकारी अभियंता यांना याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ग्राहकांच्या घरगुती विजेच्या उपकरणांचे मोठे नुकसान झाले असले तरी, याबाबत महावितरणाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून गांभीर्याने नोंद घेण्यात आलेली नाही.