नाशिक (प्रतिनिधी) : रिक्षा प्रवासात एका वृद्ध महिलेच्या ५० हजार किंमतीच्या दागिन्यांची चोरी झाल्याची घटना नाशिकरोड परिसरात घडली आहे.
शहरातील नाशिकरोड परिसरातील जेलरोडच्या त्रिवेणी पार्क ते टपाल कार्यालयापर्यंत रिक्षामधून प्रवास करणाऱ्या एका वृद्ध महिलेजवळ काळ्या रंगाची पिशवी होती. त्यामध्ये ५० हजार किंमतीचे दागिने होते. दरम्यान २ अनोळखी महिलांनी हातचलाखी करत दागिने चोरले. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विमल भास्कर गुळवे (वय ६८ रा.शिवशक्तीनगर जेलरोड) यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, रिक्षामध्ये प्रवास करत असताना २ अनोळखी महिलांनी लक्ष्य विचलित करून, १५ ग्रॅमची सोन्याची सौभाग्य पोत, सोन्याचे मणी, सोन्याचे कानातले, सोन्याच्या २ वाट्या हे दागिने काळ्या रंगाच्या पिशवीत ठेवले असता गायब केले. यामुळे शहरात चोरी करणाऱ्या महिलांची टोळी सक्रिय असल्याचे बोलले जात आहे.