नाशिक (प्रतिनिधी): शहरातील पेठ फाटा परिसरात एक युवती पायी जात असतांना तिच्या पर्समधून मोबाईल चोरी करून एका चोरट्याने पळ काढला. मात्र, पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने चोरास रंगेहात ताब्यात घेतले. दरम्यान, चोरट्याकडून ९३ हजार किंमतीचे १४ स्मार्टफोन देखील हस्तगत करण्यात आले आहेत.
पेठ फाटा येथे रविवारी (दि.६ डिसेंबर) रोजी सायंकाळी एका युवतीने फोनवर संभाषण करून फोन बॅग मध्ये ठेवला. दरम्यान, संशयित आरोपी अनिल संजय पवार (रा.फुलेनगर) याने बॅगमधून मोबाईल चोरण्याचा प्रयत्न केला असता, युवतीने आरडाओरडा केला. त्याठिकाणी पंचवटी पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी थांबले होते. दरम्यान, हवालदार गुंजाळ, संदीप गाडे, घनश्याम महाले इत्यादींनी चोराचा पाठलाग केला. चोराला पकडून त्याच्या जवळील ९३ हजार किंमतीचे १४ मोबाईल देखील हस्तगत केले. युवतीला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास सांगितले मात्र, युवतीने आई वडील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल असल्याचे सांगत तिने तक्रार दाखल केली नाही.