मांडस चक्रीवादळ विरळ झाल्याने नाशिकसह राज्यामध्ये काही ठिकाणी आज पावसाचा अंदाज
नाशिक (प्रतिनिधी): मांडस चक्रीवादळ विरळ झाल्याने आज (दि.१३) नाशिक, धुळे, जळगाव, नगर, पुणे, औरंगाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज असून ढगाळ वातावरण राहणार आहे.
१९ डिसेंबरपर्यंत किमान तापमान वाढणार असल्याने राज्यात थंडी ओसरणार असल्याचा अंदाज हवामानतज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला आहे.
दरम्यान, निफाडला राज्यातील ११ अंश सेल्सिअस एवढे नीचांकी तापमान नोंदविण्यात आले. नाशकात पारा १९.२ अंशावर होता.
बंगालच्या उपसागरातील वादळी प्रणालीमुळे राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता, त्यानुसार सोमवारी सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, बारामती, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत हलका पाऊस पडला. मात्र उर्वरित राज्यात दिवसभर ढगाळ वातावरण होते. काही ठिकाणी दुपारनंतर आकाश निरभ्र झाले. राज्यात धुळे, औरंगाबाद, नाशिक वगळता अन्य ठिकाणी किमान तापमान हे २० अंशाच्या पुढे नोंदविले गेले.
चक्रीवादळ ओमानकडे:
मांडस चक्रीवादळ केरळ-कर्नाटक किनारपट्टीवरुन मंगळवारी पुन्हा अरबी समुद्राकडे सरकणार आहे. त्यानंतर ते कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतरित होऊन येमेन व ओमानच्या आग्नेय किनारपट्टीकडे निघून जाणार आहे. -माणिकराव खुळे, हवामानतज्ज्ञ
असे होते राज्यातील किमान तापमान: निफाड ११, औरंगाबाद १७.८, नाशिक १९.९, सोलापूर २०.०, नांदेड २०.०, पुणे २०.३