नाशिक (प्रतिनिधी) : महिलांवरील अन्याय, अत्याचार रोखण्यात राज्य सरकारला अपयश आल्याच्या निषेधार्थ सोमवारी (दि.१२) शहरात ठिकठिकाणी निदर्शन आंदोलन करण्यात आले होते. आंदोलनकर्त्यांनी जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याने पोलिसांनी आमदार, पक्ष पदाधिकाऱ्यांना अटक करून नंतर सोडून दिले.
महाराष्ट्रामध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचारांमुळे भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने १२ ऑक्टोबर रोजी आंदोलनासाठी परवानगी मागण्यात आली होती. मात्र, पोलिसांकडून शहरात ५ किंवा ५ पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास बंदी असल्यामुळे परवानगी नाकारण्यात आली. तरीदेखील पोलिस आयुक्तांच्या आदेशाचे उल्लंघन करत बेकायदेशीरपणे जमावाने सार्वजनिक ठिकाणी आंदोलन केले. व सरकारच्या विरोधात घोषणाबाजीही केली. त्यामुळे सोनवणे (वय ४०रा.इंदिरानगर) यांनी आमदार देवयानी फरांदे व इतर ३२ आंदोलनकर्त्यांविरोधात इंदिरानगर पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. साईनाथनगर चौफुलीवर दुपारी १२ वाजेच्या सुमारास अर्धा तास ठिय्या मांडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यामुळे काही काळ रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. म्हणून पोलिस उपायुक्त विजय खरात, वरिष्ठ पोलिस निरीक्षक निलेश माईनकर, सह पोलिस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले.तरी आंदोलनकर्त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली