नाशिक (प्रतिनिधी) : शहरात अनेक दिवसांपासून सातत्याने वाढत असलेल्या कोरोनाबाधीतांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी महापालिकेकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर शहरातील अनेक रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधीतांसाठी खाटा उपलब्ध करून दिल्या आहेत. याची माहिती महापालिकेच्या पोर्टलवर देखील आहे. मात्र तरीसुद्धा अनेक रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांसाठी खाटा शिल्लक नसल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. या तक्रारी लक्षात घेता महापालिकेच्या वतीने १६ पथके तयार करून अचानक तपासणी मोहीम राबवण्यात आली आणि मध्यरात्रीपर्यंत शहरातील सुमारे ३५ रुग्णालयांना अचानक भेटी दिल्या. यावेळी रुग्णालयांची तपासणी करण्यात आली तेव्हा लक्षात आले की रुग्णालये उपलब्ध खाटांची संख्या तत्काळ पोर्टलवर टाकत नाहीत. तसेच काही रुग्णालयांमध्ये व्हेंटीलेटर्स सुद्धा उपलब्ध नसल्याचे आढळून आले. तर जे व्हेंटीलेटर्स आहेत ते नादुरुस्त स्वरुपात आहेत.