नाशिक (प्रतिनिधी) : रोजच्या वाढत्या कोरोनाबाधीतांच्या संख्येमुळे नाशिक शहरात वेगवेगळे हॉटस्पॉट तयार होतांना आपल्याला दिसताय. त्यामुळे महापालिकेच्या वतीने अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यातच आता कोरोनावर अटकाव आणण्यासाठी ‘धारावी पॅटर्न’ राबवण्याचा निर्णय महापालिकेकडून घेण्यात आलाय. या उपाययोजनांचा अभ्यास करून त्याचा वापर नाशिक शहरात कसा करता येईल त्यासाठी आराखडा तयार करण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांकडून देण्यात आल्या आहेत.
आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धारावी मध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर येथील वाढता धोका बघता मुंबई महानगरपालिकेने काही उपाययोजना केल्या होत्या. त्यानंतर वाढत चाललेल्या रुग्णसंख्येवर आळा बसवण्यात मुंबई महापालिकेला यश मिळाले. तसाच नाशिकमध्येही हॉटस्पॉट ठरलेल्या काही भागांमध्ये सुद्धा दाट लोकवस्ती असल्याने ‘धारावी पॅटर्न’ उपयुक्त असण्याची शक्यता आहे.