नाशिक (प्रतिनिधी) : शहरातील भूमापन कार्यालयात एका अधिकाऱ्याने खरेदी केलेल्या घरावर नाव लावण्यासाठी चक्क पैशाची मागणी केली. दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या अधिकाऱ्यास सापळा रचून रंगेहात ३० हजाराची लाच स्वीकारताना ताब्यात घेतले.
लाचलुचपत विभागाने दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दिंगबर रघुनाथ शेळके (वय ४० रा. गंगापूररोड) यांच्या वडिलांच्या नावे खरेदी केलेल्या घरावर त्यांच्या वडिलांचे नाव लावायचे होते. यासाठी शेळके यांनी अर्ज दिला असता, भूमापन विभागाचा पर्यवेक्षक संदीप हिरालाल चव्हाण (रा.सिरीन मेडोज, आनंदवली,नाशिक) याने ५० हजाराची मागणी केली. तडजोड करत रक्कम ३० हजार करून, शेळके यांनी लाचलुचपत विभागाला याची माहिती दिली. यानंतर, सापळा रचून, ३० हजाराची लाच स्वीकारताना चव्हाणला पथकाने गुरुवारी (दि.३१ डिसेंबर) रोजी संध्याकाळी ६ वाजता भूमापन कार्यालयात अटक केली.