भांडण मिटवायला गेला आणि जीव गमावून बसला… टोळक्याच्या हल्ल्यात युवकाचा मृत्यू
नाशिक (प्रतिनिधी): मालेगाव शहरात गुरुवारी पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना ताजी असताना रविवारी पहाटे सव्वा वाजेच्या (२४ जुलै) सुमारास तलवारीने दोन भावांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे.
या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे तर एकावर धुळे येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मालेगावच्या आझाद नगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी कि, मोहम्मद इब्राहिम समसुदोहा हा तरुण प्लॉट खरेदी-विकीचा व्यवसाय करतो.
त्याचे संशयित अफझल खान गुलशेर खान, कासिम (पूर्ण नाव माहित नाही), नासिर खान आयुब खान, अस्लम खान गुलशेर खान, जफर उल्ला खान अमन उल्ला खान, वसिम भांजा (सर्व रा. मालेगाव) यांच्याशी किरकोळ भांडण झाले होते. यामुळे मोहम्मद इब्राहिम याने त्याचा मित्र अब्दुल आहद मोहम्मद इसाक याला झालेल्या भांडणाबाबत माहिती दिली होती.
या दोघांमध्ये झालेले भांडण मिटविण्याचा प्रयत्न फिर्यादीने केला होता. यासाठी फिर्यादीने फोनवरून दोघांशी बोलणे करून दिले. दरम्यान, भांडण मिटविण्यासाठी दोघांना रात्री सव्वा वाजेच्या सुमारास मुन्शीनगरातील आधाराजवळ बोलवून घेतले. याठिकाणी इतरही मित्र जमले होते. भांडण मिटविण्यासाठी बोलणे चालू असताना संशयित सहा जणांनी फिर्यादीवर तलवार आणि लाकडी दांडक्याने हल्ला केला. त्याला सोडविण्यासाठी त्याचा भाऊ अब्दुल गेला असता त्याच्यावरही हल्ला करण्यात आला यात अब्दुल गंभीर जखमी झाला. या हल्ल्यात मोहम्मद इब्राहिम याचा मृत्यू झाला. हल्ला करून संशयित आरोपी फरार झाले असून अब्दुल वर धुळे येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर आझाद नगर पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.