नाशिक: भरधाव कार झाडाला धडकून एक ठार, तीन जखमी

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरातील सिटी सेंटर मॉलजवळ सोमवारी (दि.१३) पहाटे ३ वाजेदरम्यान भरधाव कार झाडावर आदळली. या अपघातात एक ठार झाला असून, तिघे गंभीर जखमी झाले आहेत.
अनंत अशोक शिरसाठ (वय २८, रा.आनंदनगर, नाशिकरोड) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. चालक अश्विन निलेश शेळके (वय २४, रा. लवटेनगर, जयभवानी रोड, नाशिक), आकाश अशोक सरोदे (वय २५) अशी जखमींची नावे आहेत.
[wpna_related_articles title=”More News of Nashik” ids=”8076,8043,8079″]
पोलिसांच्या माहितीनुसार, भरधाव कार (एमएच १४-बीके ६५७०) गोविंदनगरकडून सिटी सेंटर मॉलकडे येत होती. कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार झाडाला धडकली. अपघातात कारचा चक्काचूर झाला. कारमध्येच अनंत शिरसाठ अडकला होता. ही बाब मुंबई नाका पोलिसांना समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. रुग्णवाहिका व अॅग्निशमन दलाच्या मदतीने पोलिसांनी अनंत शिरसाठला कारबाहेर आणले. चौघांना पोलिसांनी उपचारार्थ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, अनंत शिरसाठला डॉक्टरांनी तपासणी करत मृत घोषित केले. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेळके करत आहेत.